मानसी देशपांडेचा खून चोरीच्या उद्देशाने

June 22, 2009 9:29 AM0 commentsViews: 2

22 जून, औरंगाबाद मानसी देशपांडेचा खून, चोरीच्या उद्देशाने झाल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त बिश्नोई यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. जावेद हबीब खान पठाण या अट्टल घर फोड्याने मानसीचा खून केल्याची कबुली दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं. औरंगाबाद पोलिसांनी मानसी देशपांडे खूनप्रकरणासंदर्भात रविवारी रात्री उशिरा जावेद हबीब पठाण आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली होती. दरोड्याच्या उद्देशाने जावेद खान मानसी देशपांडेच्या घरात घुसला होता. तिच्या घरी चोरी करत असताना मानसीला जाग आली. तिने जावेदचा प्रतिकार केला. त्या प्रतिकारातच मानसीचा खून झाला, असं जावेदने आपल्या कबुली जबाबात म्हटलं आहे. खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्या प्रकरणी राम बोडखे आणि प्रदीप बोडालीया या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर जावेद खान ज्या हॉटेलवर थांबला होता त्या हॉटेलवरच्या एका कर्मचार्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशीही माहिती बिश्नोई यांनी दिली.12 जूनला औरंगाबादच्या अंहिसानगर भागातील पूर्वा अपार्टमेंटमध्ये मानसी देशपांडेच्या खूनप्रकरणाची घटना घडली होती. या घटनेने औरंगाबादमधलं वातावरण ढवळून निघालं होतं. या प्रकरणी अनेक महिला संघटनाही रस्त्यावर उतरल्या होत्या. अनेक शक्यता या हत्येसंदर्भात वर्तवण्यात येत होत्या. मानसीच्या कुटुंबियांवरही तिच्या खुनाचा संशय व्यक्त केला जात होता.

close