‘शिवतीर्था’वर राज- उद्धव एकत्र

November 17, 2014 2:35 PM0 commentsViews:

UR together

17   नोव्हेंबर :  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं यावर गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. कधी भर सभेतून, तर कधी मुलाखतींतून दोन्ही बंधूंनी एकमेकांना ‘टाळी’ देण्याचा प्रयत्न केला. पण ‘टाळी’ काही वाजली आहे. मात्र आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिनानिमित्त दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले.

राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला आदरांजली वाहिली. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे स्मृतिस्थळी गेले होते. बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव यांच्यासह त्यांचा मुलगा तेजस आणि नेते संजय राऊतही त्यांच्या सोबत उपस्थित होते. यावेळी उद्धव आणि राज यांच्यात बराच वेळ चर्चा झाली.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत, अशी तमाम मराठी माणसांची इच्छा आहे असं मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे. हा दु:खाचा क्षण आहे, पण यानंतर सगळे सुखाचे क्षण यावेत यासाठी या दोघं भावांनी एकत्र येण्याचा विचार करावा असं ही ते म्हणाले. भविष्यात जर हे दोघे जणं एकत्र आले तर त्याचा महाराष्ट्रातील जनतेला आनंदच होईल असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

याआधी राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी हीचा अपघात झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे उर्वशीला भेटायला हिंदूजा हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यानंतर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र पाहण्यास मिळाले.


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close