पवार जे बोलतात नेमकं त्याचं उलटं करतात -उद्धव ठाकरे

November 18, 2014 4:54 PM0 commentsViews:

uddhav_on_sharad_pawar18 नोव्हेंबर : शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते बोलत नाही. मुळात पवार काय करतील त्याचा नेम नाही. ते जे बोलतात नेमकं त्याच्या उलटं करतात अशा शेलक्या शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं. जोपर्यंत राजकीय अस्थिरता संपत नाही तोपर्यंत आम्ही विरोधीपक्षाची भूमिका ठामपणे बजावू असा सावध पवित्राही उद्धव यांनी घेतला. तसंच राज आणि माझ्या भेटीमध्ये कुठलंही राजकारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागाचा लोकार्पण सोहळा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आज सकाळीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत देऊन एकच खळबळ उडवून दिली. पवारांच्या या वक्तव्याबाबत उद्धव यांना विचारले असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. सध्या महाराष्ट्रातलं राजकारण हे इमर्जन्सी वॉर्डात पोहचलं आहे. शरद पवार यांना जनतेनी माफ करायला हवंय. ते कधी काय बोलतात त्यांना कळत नाही. पवार काय करतील त्याचा नेम नाही ते जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं करतात. त्यामुळे अस्थिरता संपेपर्यंत आम्ही कोणताही भूमिका घेणार नाही असा सावध पवित्रा उद्धव यांनी घेतला. सध्या जे काय चाललंय त्याबद्दल जनतेत संताप आहे. उद्या जर मध्यावधी निवडणुका झाल्यास तर हा संताप मतपेटीतून प्रगट होईल असा इशाराही उद्धव यांनी दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपशी वितुष्टावर खंत व्यक्त केली. राजकारणात काय चाललेय ते कळत नाहीये. 25 वर्षांपासूनचे जे मित्र होते ते दुरावले आणि जे विरोधात होते त्यांनी पाठिंबा दिला असं सांगत राजकीय अस्थिरता संपेपर्यंत शिवसेना शांत राहणार आणि विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे निभावणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

राज भेटीमध्ये राजकारण नाही -उद्धव

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कवर राज आणि उद्धव एकत्र आल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. पण  राज आणि माझ्या भेटीमध्ये कुठलंही राजकारण नाही. शिवाजी पार्कवर अनेक राजकीय पक्षांचे नेतेही काल उपस्थित होते त्यामुळे याचा राजकीय अर्थ काढू नये अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

चौथ्या क्रमांकाच्या पक्षाने निवडणुकीच्या धमक्या देऊ नये -राऊत

दरम्यान, सध्या पवारांना विशेष काम नाही. पवारांवर विश्वास ठेवता येत नाही. ज्यांनी पवारांवर विश्वास ठेवला ते संपले. पवारांवर विश्वास ठेवून राजकारण करणं म्हणजे महाराष्ट्राचं नुकसान करणं आहे चौथ्या क्रमांकावर आलेल्या पक्षाने निवडणुकीच्या धमक्या देऊ नये असं खणखणीत प्रत्युतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलं. तसंच एमआयएम हे महाराष्ट्रात पसरणारं विष आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंनी घेतलेल्या भूमिका योग्य असून त्यांना सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. भाजपं एमआयएमला पाठिंबा देत असल्याचा पुरावा पवारांकडे असल्यास त्यांनी तो जनतेला द्यावा असं आवाहनही संजय राऊत यांनी केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close