जास्त खोलात जाऊ नका, ‘दादू’ची भेट कौटुंबिक -राज ठाकरे

November 18, 2014 11:19 PM0 commentsViews:

raj_on_uddhav_meet18 नोव्हेंबर : एक भावाचा तर दुसरा भावनांचा विषय असतो. शिवाजी पार्कवर उद्धव यांच्याशी झालेली भेट ही कौटुंबिक होती. जास्त खोलात जाऊ नका, याचा राजकीय अर्थ काढू नका आणि त्याठिकाणी राजकीय चर्चा तरी कशी होणार असा सवाल उपस्थित करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या विषयाला पूर्णविराम दिलाय. यापुढे पक्षाच्या विस्तारावर लक्ष देणार असून पक्षात फेरबदल केले जातील अशी घोषणाही राज ठाकरेंनी केली. ते पुण्यात बोलत होते.

राज-उद्धव एकत्र येतील यावर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा आहे. पण सोमवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. राज आणि उद्धव यांना एकत्र पाहून पुन्हा एकदा राज्यभरात ‘टाळी’ची चर्चा सुरू झाली. पण या चर्चेला आता उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरेंनी पूर्णविराम दिलाय. राज आजपासून पुण्याच्या दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागील वर्षी काही कारणांमुळे स्मृतिस्थळावर गेलो नव्हतो. पण यावेळी जाण्याचं ठरवलं. आता तिथे गेल्यावर उद्धव यांच्याशी भेट होणं हे साहजिकच होतं. अशा वेळी सतत टाळण्यासारखी ती गोष्टही नाही. आम्ही भेटलो, एकत्र बसलो. पण याचा अर्थ असा थोडा की आमच्यात काही राजकीय चर्चा झाली. मुळात ती जागा तरी राजकीय चर्चेची होती का ?, उर्वशीचा अपघात झाला होता तेव्हा उद्धव हॉस्पिटलमध्ये आले होते. तिथेही मी भेटलो होतो. आता ती जागा सुद्धा राजकीय चर्चेची होती का ? एक विषय असतो तो भावाचा तर दुसरा भावनांचा विषय असतो. त्यामुळे आणखी खोलात जाऊ नका आणि या भेटीचा कुणीही राजकीय अर्थ काढू नका, एकत्र येण्याबाबत मी अजून काहीही विचार केलेला नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

‘सभागृहात मतदान घ्यायला पाहिजे होते’

महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली नव्हती. नेमकं कळतं नाही की कोण विरोधक आहे आणि कोण सत्ताधारी, कुणाचा कुणाला पाठिंबा आहे नेमकं काही कळत नाही. ज्यावेळी विश्वासदर्शक ठराव सभागृहात मंजूर झाला त्यावर मतदान घेणं गरजेचं होतं. आवाजी मतदानांवरुन बहुमत सिद्ध करणे ही काही पद्धत नाही. सभागृहात मतदान झालं असतं तर सगळं स्पष्ट झालं असतं. तुम्ही जर बहुमतच सिद्ध करताय तर निदान लोकांना तरी कळू द्यायचं असतं की, कुणाचा पाठिंबा घेतला. भाजप आणि राष्ट्रवादीने हे सगळं ठरवून केलंय की काय असा संशयही राज यांनी व्यक्त केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close