अखेर पेल्यातलंच वादळं, राष्ट्रवादीचा भाजपला पूर्ण पाठिंबा

November 18, 2014 11:38 PM0 commentsViews:

ncp_on_bjp18 नोव्हेंबर : ‘मध्यावधी निवडणुका कधीही लागणार’ असं सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकच राजकीय बॉम्ब फोडला. पण संध्याकाळी हे वादळं पेल्यातच ठरलं. पहिल्या दिवसांपासून आमचा भाजपला पाठिंबा होता तो आजही कायम आहे आणि राहणार आहे. आमच्या भूमिकेत कोणत्याही बदल झालेला नाही अशी सारवासारव राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली.

राष्ट्रवादीच्या अलिबागमध्ये सुरू असणार्‍या चिंतन शिबिरात आज (मंगळवारी) अध्यक्ष शरद पवारांनी मोठा गुगली टाकला आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. निवडणुका कधीही होऊ शकतात, कामाला लागा, असा आदेशच पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. आपण काही सरकार चालवायचा मक्ता घेतलेला नाही असं म्हणत त्यांनी भाजपवरचं दबावतंत्राची खेळीही खेळली. पवारांच्या या वक्तव्यावर खळबळ माजल्यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादीकडून सारवासारवीचा प्रयत्न करण्यात आला पवारांच्या वक्तव्याचा अर्थ वेगळा होता, असं सांगण्यात आलं. “आमच्या भूमिकेत कुठेही बदल झालेला नाही. पहिल्या दिवसांपासून जी भूमिका होती ती आजही आहे. सरकार स्थिर राहण्यासाठी आमचं पूर्ण समर्थन आहे. सरकारला आमचा पाठिंबा हा चांगले प्रश्न सोडवण्यासाठी आहे. आता हा पाठिंबा टिकवणे भाजपच्या हातात आहे. त्यामुळे भाजपने चांगलं काम केलं पाहिजे असा अर्थ पवार यांच्या विधानाचा होता. पण याचा अर्थ असा होतं नाही की, उद्या सरकार अस्थिर झालं आणि मध्यावधी निवडणुका लागल्यात असं काहीही नाही”, असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला. विशेष म्हणजे सरकार स्थापन होऊन आठवडाही उलटला नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली होती. आमचं सरकार स्थिर आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर पवार जे बोलतात त्याचं नेहमी उलटं होतं असतं असं सांगत उद्धव ठाकरेंनी तुर्तास विरोधीपक्षनेतेपदीच राहण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. अखेरीस पवारांनी एका प्रकारे चाचपणी करून आपण निर्माण केलेलं वादळ पेल्यातलच ठरवलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close