पवारांचं घूमजाव, ‘सरकार पाडण्यात रस नाही’ !

November 19, 2014 4:28 PM0 commentsViews:

sharad_pawar_on_bjp19 नोव्हेंबर : ‘राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागणार’ असे संकेत देऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. आता मात्र खुद्द पवारांनी आपल्या या विधानाबाबत घूमजाव केलंय. आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही. सरकारनं स्थिर राहून जनतेच्या हिताची कामं करावीत त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा राहिल, अशी स्पष्टोक्ती शरद पवारांनी दिली. तसंच मार्केटिंग करण्यात मोदींचा हात कुणी धरू शकत नाही अशा शेलक्या शब्दात पवारांनी टीकाही केली. अलिबागमध्ये राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराची आज (बुधवारी) सांगता झाली. समारोपाच्या भाषणात पवार बोलत होते.

भाजपला अगोदर बिनशर्त पाठिंबा आणि त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आवाजी मतदानात राष्ट्रवादीचं नाव न घेता भाजप सरकार सत्तेवर विराजमान झालं. पण भाजप सरकारने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला जरी असला तरी सरकार अस्थिरतेची तलवार कायम टांगून आहे. शिवसेनेच्या गोटातून पुन्हा सत्तेत सहभागाची हालचाल पुन्हा सुरू होताच पवारांनी मंगळवारी चाचपणी केली. राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार दीर्घकाळ स्थिर राहणार नाही, कधीही मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागेल असा इशाराच शरद पवारांनी दिला. साहजिक याचे पडसाद दोन्ही पक्षात उमटले. शिवसेनेनं सावध पवित्रा घेत तूर्तास विरोधीबाकावर बसण्याचं जाहीर करून टाकलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थिर आहे असा खुलासा केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी रात्री आमच्या भूमिकेत बदल झालेला नाही आमचा भाजपला पूर्ण पाठिंबा आहे अशी सारवासारव केली. आज खुद्द पवारांनीच या वादावर पडदा टाकला. आम्हाला पाडा-पाडीत रस नाही. पण सरकारने चांगले काम केले नाही, महाराष्ट्राच्या हिताची जपवणूक केली नाही तर मग त्याठिकाणी कुठलाही राजकीय पक्ष काय भूमिका घेणार ?, पण याचा अर्थ असा होत नाही की, आम्ही सरकार पाडणार असा खुलासा पवारांनी केला. आम्ही लगेच सरकार पाडण्यासाठी निघालो असा जावई शोध लावला गेलाय हे जरा थोडसं अति झालंय अशी खंतही पवारांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौर्‍यांचा चांगलाच समाचार घेतला. मोदींनी यूएनमध्ये भाषण केलं, न्यूयॉर्कमध्ये भारतीयांशी संवाद साधला पण हा संवाद भारतात जास्तीत जास्त कसा पोहोचेल, यात मोदींना जास्त रस होता. त्यामुळे मार्केटिंग करण्यात मोदींचा हात कुणी धरू शकत नाही असा टोला पवारांनी लगावला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close