‘मित्रों अलविदा’, परदेश दौरा आटोपून मोदी भारताकडे रवाना

November 19, 2014 11:33 PM0 commentsViews:

modi_retern19 नोव्हेंबर : दहा दिवसांचा परदेश दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आता भारताकडे रवाना झाले आहेत. आज (बुधवारी) दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी मोदींनी फिजीला भेट दिली. फिजीच्या विकासात सहभागी होण्यासाठी भारत तयार असल्याची ग्वाही देत तिथल्या लघू आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी 50 लाख डॉलर निधी देण्याची घोषणा मोदींनी केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरूद्दीन यांनी ‘मित्रों अलविदा’ असं ट्विट करून दौरा यशस्वी झाला असल्याची माहिती दिली. फिजीच्या सुवा विमानतळावर मोदींना भव्य निरोप देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 नोव्हेंबर रोजी तीन देशांच्या दौर्‍यासाठी रवाना झाले होते. 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी त्यांनी म्यानमारची राजधानी नेपेडामध्ये आशिया शिखर संमेलनात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर रवाना झाले. तिथे त्यांनी 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी जी-20 देशांच्या परिषदेत हजेरी लावली. या परिषदेनंतर मोदींनी सिडनीत अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी मोदींनी आज फिजीला भेट दिली. सकाळी फिजीची राजधानी सुवा इथं पोहचले तिथे त्यांचं पारंपारिक पद्धतीने स्वागत झालं. त्यानंतर त्यांनी फिजीच्या संसद आणि राष्ट्रीय विद्यापिठात सिव्हील सोसायटीच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आजच्या तरुणाला फक्त शिक्षणच नाही तर टेकसॅव्हीसुद्धा असलं पाहिजे, असं मोदींनी भाषणात म्हटलं. डिजिटल इंडिया या उपक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला. भारतात शिकणार्‍या फिजीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली. या भाषणात त्यांनी जागतिक तापमानवाढीच्या मुद्द्याला हात घातला. पर्यावरण रक्षणासाठी दोन्ही देशांनी उपाययोजना आखल्या पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. फिजीच्या नागरिकांना व्हिसा ऑन अराईव्हल सुविधा देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close