सलग 3 वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यावर दुष्काळाचं संकट

November 20, 2014 11:30 AM0 commentsViews:

- बालाजी निरफळ, उस्मानाबाद
20 नोव्हेंबर :  सलग 3 वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यावर दुष्काळाचं संकट आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीप आणि रब्बी दोन्ही पिकं हातातून गेली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 88 हजार हेक्टर क्षेत्रांपैकी अवघ्या 1 लाख 31 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी केली होती. हा शेतकरी या दुष्काळाच्या फटक्याने आता पूर्ण उद्‌ध्वस्त झाला आहे.

आतल्या आतच घुसमटणारा बळीराजा, कोरड्या पडलेल्या जमिनीकडे बघत खंतावत जाणारा शेतकरी, त्याच्या डोळ्यातील पाण्याने ना ही जमीन भिजतेय ना निसर्गराजा प्रसन्न होतोय. गेली 3 वर्षं उस्मानाबादमधले हे शेतकरी दुष्काळाचा सामना करत आहेत. यावर्षी तर हे संकट अधिकच तीव्र झालं आहे. खरीप हंगाम तर हातचा गेलाच होता पण रब्बीकडूनही आता काही आशा नाही. एकरच्या एकर शेतजमीन भेगाळली आहे. त्यातं धरणंही कोरडी पडली आहेत. जनावरांना खायला काय घालायचं हा प्रश्न या शेतकर्‍यांना पडला आहे. त्यामुळेच घरच्याप्रमाणे असलेल्या आणि आजवर त्यांना सुखाचे दिवस दाखवलेल्या या जनावरांना विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. खाटकाच्या दावणीला त्यांना बांधण्यावाचून या शेतकर्‍यांकडे आता काही पर्याय उरलेला नाही.

या कसदार शेतजमिनीवर पारंपरिक शेतीप्रमाणे आधुनिक पद्धतीनंही शेती उत्पादन घेतलं तर कमी पाण्यात अधिक फायदा होऊ शकेल, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे आधुनिक शेतीच्या प्रसारासाठी सरकारनेही अधिक प्रयत्न करावेत आणि शेतकर्‍यांनीही आता या मुद्द्याचा विचार करावा.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close