शिवसेनेच्या ‘बील भरू नका ‘ आंदोलनाला हिंसक वळण

June 24, 2009 10:46 AM0 commentsViews: 2

24 जून रिलायन्स, टाटा, बेस्ट या वीज कंपन्यांच्या वीज दरवाढीविरुद्ध शिवसेनेने पुकारलेल्या 'बील भरू नका ' आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. बुधवारी सकाळीच शिवसेनेने अंधेरीतलं रिलायन्सचं वीज बील भरणा केंद्र बंद पाडलं. तर दादरमध्ये गोखले रोड तसंच भवानी शंकर रोड, वडाळ्यात वडाळा डेपो आणि भायखळा इथली केंद्रंही बंद पाडली आहेत. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी, एस. व्ही. रोडवरच्या रलायन्स केंद्रांवरही मोर्चा काढला. यावेळी तिथे बील भरण्यासाठी आलेल्या लोकांना परत माघारी पाठवलं. मुंबई आणि उपनगरातल्या वीज भरणा केंद्रं बंद पाडण्याच्या घटनांच्या पाश्‍र्वभूमीवर पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी अटकसत्र मोहीम हाती घेतली आहे. जितेंद्र जानवळे, गजानन कीर्तिकर, विशाखा राऊत, सुनील प्रभू, सुभाष वारीसे शिवसेना नेत्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत रहायचं असेल तर विजेचे दर कमी करावेच लागतील अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वीज कंपन्यांना कडक इशारा दिला आहे.रिलायन्स एनर्जी ही प्रामुख्याने मुंबईच्या उपनगरांमध्ये वीज पुरवठा करते. गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स एनर्जीने एमईआरसीचं नाव पुढे करत सतत वीजदर वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत होता. नागरिकांनी अनेकदा शिवसेनेकडे रिलायन्स एनर्जीच्या वीजदरवाढी विरोधातल्या तक्रारी केल्या होत्या. नुकतीच रिलायन्सने 60 टक्क्यांपर्यंत नव्याने वीज दरवाढ केली. शिवसेनेने रिलायन्सला नव्याने केलेली दरवाढ मागे घेण्याचा इशारा दिला होता. मात्र रिलायन्सने नव्याने केलेली दरवाढ मागे न घेतल्यामुळे शिवसेने मुंबई आणि उपनगरातली रिलायन्सची वीज भरणा केंद्रं बंद पाडण्याचं आंदोलन छेडलं.

close