दीपक मानकर विरोधात पुणे कोर्टाने जारी केलं अजामीनपात्र वॉरंट

June 24, 2009 3:10 PM0 commentsViews: 2

24 जून दीपक मानकरच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. पुणे पोलिसांनी दीपक मानकरला फरार म्हणून घोषित करण्यासाठी कोर्टाकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर कोर्टाने हे वॉरंट जारी केलं आहे. दीपक मानकर हा पुण्याचा काँग्रेसचा नगरसेवक होता. कोर्टाने रीतसर फरारी घोषीत केल्यानंतरही जर दीपक मानकर शरण आला नाही तर त्याच्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल, असं पुण्याचे पोलीस कमिशनर सत्यपाल सिंग यांनी सांगितलं आहे. आत्तापर्यंत मानकरच्या 56 प्रॉपर्टी शोधण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. मानकरला पकडणार्‍याला दहा हजाराचं बक्षिसही जाहीर करण्यात आलं आहे. मानकरचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्याच्या कोर्टाने गुरुवारीच फेटाळला होता. पण आपली अटक टाळण्यासाठी मानकर मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी वेळ मिळावा म्हणूनच पुणे पोलीस दीपक मानकर याला अटक करत नसल्याचं बोललं जातं आहे. याप्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पुण्यात शुक्रवार पेठेतील नातू कुटुंबीयांच्या वाड्याची जागा दादागिरी करून बळकावण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार यशवंत नातू यांनी खडकी पोलीस स्टेशनमध्ये केली होती. तसंच पुण्याच्या काँग्रेसभवनमध्ये मानकरने नातू कुटुंबीयांवरदादागिरी केल्याचा आरोप यशवंत नातू यांनी केला होता. याप्रकरणी लॅन्ड माफिया दीपक मानकर याला काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं.

close