पुण्यात फोफावतंय लँड माफियांचं साम्राज्य

June 25, 2009 11:33 AM0 commentsViews: 6

25 जून शिवसेनेतून हकालपट्टी केलेला शिवाजी मानकर याचंही जमीन बळकावण्याचं प्रकरण पुढे आलं आहे. शिवाजी मानकर हा काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेला दीपक मानकर याचा भाऊ आहे. पुण्याच्या पूर्णिमा प्रभू यांना धाक दाखवून जागा हडपण्याचा प्रयत्न शिवाजी मानकरने केल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या ऍड. नीलम गो-हे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत उघड केलं होतं. त्यावेळी शिवाजी मानकरच्या अरेरावीच्या कृत्यामुळे त्याची शिवसेनेतून हकालपट्टी केली असल्याचंही गो-हे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता शिवाजी मानकरला जमीन बळकावल्याप्रकरणी अटक होऊन त्याची जामिनावर मुक्तताही झाली आहे. त्यामुळे आधी दीपक मानकर नंतर अजित पवार आणि आता शिवाजी मानकर यांचं जमीनहस्तांतरण प्रकरण पाहता सुसंस्कृत पुण्यात लॅन्ड माफियांचा सुळसुळाट झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या फर्ग्युसन रोडवरच्या मुकुंदानंद या बंगल्यात पूर्णिमा प्रभू भाड्याने राहतात. पूर्णिमा प्रभू यांच्या म्हणण्यानुसार 29 डिसेंबर 2008 रोजी सकाळी 11 च्या सुमारास अचानक 60-70 जण प्रभूंच्या घरात घुसले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. प्रभूंच्या भावालाही त्या मोठ्या जमावाने अमानुष मारहाण केली. त्यानंतर प्रभू आणि मानकर यांनी परस्परांविरूद्ध तक्रारी केल्या होत्या. प्रभू यांना मुंबई हायकोर्टातून अटकपूर्व जामीन मिळाला. शिवाजी मानकरला अटक होऊन त्याची जामिनावर मुक्तताही झाली. त्यामुळे पूर्णिमा प्रभू यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले. पुण्यातून दररोज अशी समोर येणारी अनेक प्रकरणं पाहता पुणे पोलिसांसमोर लँडमाफियांच्या विळख्यातून मुक्त करण्याचं मोठं आव्हानच आहे.

close