दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकीला 30 जूनपर्यंत अटकपूर्व जामीन

June 26, 2009 1:38 PM0 commentsViews: 1

26 जून पुण्याच्या शुक्रवार पेठेत राहणा-या यशवंत नातू यांच्या बंगल्याच्या जमीनहस्तांरण प्रकरणी लँडमाफिया दीपक मानकर आणि बिल्डर सुधीर कर्नाटकी यांची अटक टळली आहे. 30 जूनपर्यंत त्या दोघांना अटक न करण्याचे मुंबई हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. मानकर आणि कर्नाटकी यांच्यावरच्या जमीनहस्तांरण प्रकरणाची पुढची सुनावणी 30जूनला होणार आहे. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मानकरने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत. लँडमाफिया दीपक मानकरवर जमीन हस्तारणं प्रकरणी 12 वा गुन्हा दाखल झाला आहे. चतुश्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. बाणेरमध्ये 5 गुंठे जमीन हडपल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. विजयकुमारसिंग यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दीपक मानकर अजूनही फरार आहे. फरारी नगरसेवकाला पोलीस शोधू शकत नाहीत आणि तो मात्र कोर्टात जामिनासाठी अर्ज करतोय, याबद्दल पुणेकरांमधून आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. मानकरचा पत्ता सांगणार्‍याला पोलिसांनी यापूर्वीच 10 हजाराचं बक्षीसही जाहीर केलं आहे. तसंच पुणे पोलिसांनी मानकरला शोधण्यासाठी नऊ पथकं तयार केली आहेत.

close