अपंग स्टॉल धारकांना बीएमसीची नोटीस

June 26, 2009 1:48 PM0 commentsViews: 12

26 जूनगोविंद तुपे मुंबईतल्या अपंग स्टॉल धारकांना बीएमसीने अतिरिक्त व्यवसाय बंद करण्यासाठी नोटीस बजावली आहे.अपंगांचे स्टॉल्स शिववडा धारकांच्या घशात घालण्याचा बीएमसीचा डाव असल्याचा आरोप अपंगांच्या संघटनेने केला आहे. बीएमसीने अपंगांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अतिरिक्त व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावल्यामुळे त्यांच्यावरउपासमारीचं संकट कोसळलं आहे. सध्या अपंगांच्या स्टॉल्सवर पीसीओ खेरीज झेरॉक्स, कुरिअर, टायपिंग, एसटीचं बुकिंग, कोल्डड्रिंक्स, भाज्या, न्यूज पेपर, मॅगझीन्स असे निरनिराळे जीवनपयोगी जोडधंदे चालतात. एकाला दुसरा जोडधंदा असल्याशिवाय चार माणसांचं पोट चालवणं कठीण आहे हे आजच्या काळात कोणीही मान्य करेल. पण मुंबई महानगरपालिकेने एक नोटीस काढली. त्या नोटीसमध्ये ' पीसीओखेरीज कुठलेही धंदे चालवायचे नाहीत, नाही तर स्टॉल जप्त होईल, ' असे स्पष्ट शब्दात आदेश दिले आहेत. पण नऊ ते पाच अशा सरकारी वेळेत सरकारी पद्धतीने काम करणार्‍या सरकारी बाबूंना याची किंमत काय कळणार, असा प्रश्न अपंग संघटनांकडून विचारला जात आहे. तर बीएमसीचा निर्णय म्हणजे अपंगांवर कुर्‍हाड मारण्याचा जणू प्रयत्नच केला जात आहे, असंअपंग स्टॉलधरक बाबा कांबळे यांचं म्हणणं. बाबा कांबळे हे चुनाभट्टीत गेली 10 वर्षं स्टॉल चालवत आहेत. ' मोबाईल फोन आल्यामुळे पीसीओचा धंदा कमी झाला आहे. त्यात आम्हाला स्टॉलवर पीसीओशिवाय इतर कोणताच व्यवसाय करायचा नाही, अशी नोटीस दिली आहे. काहीही झालं की आम्हा अपंगांवरच येतं, अशी खंतही बाबा कांबळे यांनी व्यक्त केली.बीएमसीने 2000 साली एक सर्क्युलर काढलं होतं. त्यात म्हटलेलं अपंग स्टॉलधारकांना पीसीओ व्यतिरिक्त पाच जोड धंदे करता येतील. पण आता अपंगांच्या स्टॉलवर बीएमसीचा डोळा का ? असा प्रश्न अपंग स्टॉल धारकांकडून केला जात आहे. अपंगांना आपल्या स्टॉलवर फक्त पीसीओच चालवता येईल अशी ऑर्डर हाय कोर्टाने 2007 साली दिली होती. परंतु दीड वर्षानंतर हाय कोर्टाने दिलेल्या ऑर्डरची अंमलबजावणी करण्याची बीएमसीला का गरज पडली, असं जेव्हा बीएमसी अधिकार्‍यांना विचारलं तेव्हा मात्र त्यांनी कॅमेर्‍यावर बोलायला नकार दिला. याविषयावर बोलताना अपंग संघटनेचे अध्यक्ष श्रीराम पाटणकर म्हणाले की, शिवसेनेची बीएमसीत सत्ता आहे. सेनेच्या शिववड्यासाठी आता त्यांना मोक्याच्या जागा हव्या आहेत. त्याच्यासाठी अंपगांचा बळी दिला जात आहे. 'मुंबईत अपंगांचे स्टॉल जवळपास 5 हजार 200च्या आसपास आहेत. त्यापैकी 2 हजार 775 सुरू आहेत. म्हणजे एकानोटीसीने 2 हजार 775 कुटुंबांवर घाव पडणार. आधीच अपंग असलेल्यांच्या पायात शिवसेना का बरं बेड्या अडकवू पाहत आहे, नेमकं याचंच कोडं उलगडत नाही आहे.

close