चाकूचा धाक दाखवत हैदोस घालणार्‍या चोरट्याचा प्रताप सीसीटीव्हीमध्ये कैद

November 25, 2014 1:01 PM0 commentsViews:

25 नोव्हेंबर :  एका चोराने चाकूचा धाक दाखवत ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल (सोमवारी) रात्री नालासोपारा येथे घडली. शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने नालासोपारामध्ये खळबळ माजली असून चोरट्याचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेर्‍यातही कैद झाला आहे.

नालासोपारा येथील आचोळे रोड येथे गगन गोल्ड हे ज्वेलर्सचे दुकान असून या दुकानापासून 100 मीटर अंतरावरच तुळींज पोलिस चौकी आहे. सोमवारी रात्री 9.20 च्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेला भुरटा चोर दुकानात शिरला आणि त्याने थेट मालकालाच धमकावले. मालकाने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्या चोराने बॅगमधून सोळा इंचाचा चाकू काढून मालकावर वार केला. पण सुदैवाने हा वार मालकाच्या कमरेवरील पट्‌ट्यावर झाला आणि मालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. मालकाने दुकानात खोटे दागिने असल्याचे सांगितले. ऐवढे करुनही दुकानातून काहीच मिळत नसल्याने तो चोर हताश झाला आणि त्याने तिथून पळ काढला.

दुकानातून पळ काढत हा चोर नालासोपारा रेल्वे स्थानकावर पोहोचला. तिथे विराज निकम नामक व्यक्तीचा या चोरट्याला धक्का लागला. यामुळे संतापलेल्या चोराने विराज निकमवर चाकूने वार केला. यात विराज जखमी झाला असून त्यांच्यावर स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.

शहरातील दोन प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी सशस्त्र चोराने घातलेल्या या गोंधळामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण असून नागरिक पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित करत आहेत. तर पोलिसांनी मात्र प्रसारमाध्यमं छोट्या छोट्या घटनांना जास्त महत्त्व देत असल्याचे सांगत माहिती देण्यास नकार दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close