खडसेंना उपरती, शेतकर्‍यांच्या वीजबिलाला दिली स्थगिती

November 25, 2014 4:17 PM0 commentsViews:

eknath_khadse_on_power_bill25 नोव्हेंबर : ‘तुम्ही मोबाईलचं बिल भरता, पण विजेचं बिल भरत नाही’ असं विधान करून एकच खळबळ उडवून देणारे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आता शेतकर्‍यांना दिलासा दिलाय. दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या वीजबिलाला स्थगिती देण्याची घोषणा खडसे यांनी केलीये. तसंच टंचाईग्रस्त शेतकर्‍यांना वीजबिलात 33 टक्के सूट देण्यात येणार आहे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफही करण्यात आलीये.

एकीकडे बळीराजा अस्मानी संकटाने खचला असतांना सरकारने पाठिशी उभे राहण्याऐवजी त्यांच्याच जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय. ‘मोबाईलवर बोलणं थांबू नये म्हणून तुम्ही मोबाईलचं बिल भरता ना महिन्याचं महिन्याला, पण ज्याच्यामुळे उजेड मिळतो त्याचं विजेचं बिल भरत नाही. मला काही हे पटत नाही’, अशा शब्दात खडसेंनी शेतकर्‍यांनाच सुनावलं होतं. खडसे यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी एकच टीकेची झोड उडवली. असा उद्दामपणा करू नका नाहीतर तुमचा अजित पवार होईल असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. मात्र, आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला अशी सारवासारव खडसे यांनी केली. पण त्याचसोबत शेतकर्‍यांना मोठा दिलासाही दिला. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची वीज तोडणे आणि वीजबील वसुलीला स्थगिती देण्यात आल्याचा महत्वपूर्ण निर्णय खडसेंनी घेतलाय. तसंच टंचाईग्रस्त शेतकर्‍यांना वीजबिलात 33 टक्के सूट देण्यात येणार आहे. ज्या भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात तातडीने पाण्याचे टँकर पुरवण्याचे आदेशही देण्यात आले. दुष्काळी भागातील शेतकर्‍यांनाच नाहीतर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आलाय. दहावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आलंय. दरम्यान, केंद्राला विनंती केल्याने पंचनाम्यात सूट मिळाली आहे, त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने जास्तीत जास्त मदत केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. तर सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना त्वरित मदत द्यावी, नाहीतर काँग्रेस सरकारविरोधी आंदोलन करेल असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

एकनाथ खडसेंनी नेमक्या कोणत्या घोषणा केल्यात ?

- दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची वीज तोडणे आणि वीज बील वसुलीला स्थगिती
- टंचाईग्रस्त शेतकर्‍यांना वीजबिलात 33 टक्के सूट
- दुष्काळग्रस्तांना पाण्याचे टँकर पुरवण्याचे सरकारचे आदेश
- दहावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close