अकरावी ऑनलाईन ऍडमिशनचा घोळ कायम

June 27, 2009 9:21 AM0 commentsViews: 4

27 जून, मुंबई शुक्रवारच्या खेळखंडोबानंतर शनिवारपासून सुरू झालेली ऑनलाईन ऍडमिशन पद्धती व्यवस्थित सुरू असल्याचा सरकारचा दावा पुन्हा फोल ठरला. ऑनलाईन ऍडमिशनसाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख 10 हजार 294 आहे तर ऑनलाईन फॉर्मस यशस्वीपणे भरलेल्याची संख्या फक्त 40 हजार 68 आहे. या 40 हजार पैकी किती विद्यार्थ्यांनी फॉर्म सबमिशन सेंटरवर फॉर्म दिलेत, याची आकडेवारी अजून मिळालेली नाही. दुपारी बारा वाजता एमकेसीएलकडून तशी माहिती मिळाली आहे. ऑनलाईन ऍडमिशनसाठी शनिवारी सकाळपासून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले. त्यामुळे त्यांनी ऑनलाईनबद्दल आनंद व्यक्त केला. प्रत्येक कॉलेजमध्ये रांगा लावण्यापेक्षा अर्ध्या तासात फॉर्म भरणं चांगलं असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. पण नेमके किती जणांचे अर्ज नीट व्यवस्थित भरले गेले आहेत, यावर शंका निर्माण होत आहे. यावर्षीपासून अकरावीकरता राज्य सरकारने पहिल्यांदाच ऑनलाईन फॉर्म भरणं सक्तीचं केलं आहे. शुक्रवारी ऑन लाईन प्रवेश प्रक्रियेसाठी निर्माण झालेल्या समस्येनंतर एमकेसीएनने शनिवारी वेबसाईटसाठी 11 सर्व्हर्स वापरले आहेत.अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसी इथे हे सर्व्हर बसवले आहेत. भारतापेक्षा अमेरिकेत अधिक वेगाचं बँडविंथ आहे. त्यामुळे तिथले सर्वर वापरले जात आहेत. गुजरात राज्यामध्ये संपूर्ण प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन आहे. यंदा मुंबईच्या एमएमआरडीए विभागात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जर यशस्वी झाली तर पुढील वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये 11 वी प्रवेश ऑनलाईन करण्याचा शिक्षणमंत्र्यांचा विचार आहे.

close