सहा महिन्यात एलबीटी रद्द करणार -मुख्यमंत्री

November 25, 2014 8:09 PM0 commentsViews:

cmonlbt25 नोव्हेंबर : जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी रद्द करणार नाही असा घूमजाव केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपरती झाली असून एलबीटी रद्द करणारच अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलीये. एलबीटीला नवा पर्याय शोधत आहोत. येत्या 6 महिन्यांच्या काळात जीएसटी लागू होईल आणि एलबीटी रद्द होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

निवडणुकांच्या अगोदर भाजपने आपल्या जाहीरनाम्यात एलबीटी रद्द करणार असं ठासून सांगितलं होतं. पण सत्तेत आल्यावर भाजप सरकारने घूमजाव केलं. जीएसटी लागू होत नाही तोपर्यंत एलबीटी रद्द होणार नाही असा पवित्रा राज्य सरकारने घेतला होता. मात्र आपल्याच पवित्र्यामुळे नवं सरकार टीकेचं धनी झालं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता पुन्हा एकदा एलबीटीबद्दल नव्याने भूमिका मांडलीये. एलबीटी आम्हाला मान्य नाही. एलबीटी रद्द करणारच आहोत. पण यासाठी पर्याय काय असू शकले याचा विचार सुरू झाला आहे. त्याबद्दल बैठक झाली असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच जीएसटी लागू झाल्यावर एलबीटी रद्द होईल असं काहीही होणार नाही. हा सर्वांचा गैरसमज झाला होता. ज्या दिवशी जीएसटी लागू होईल त्या दिवशी एंट्री 52 आहे म्हणजे स्थानिक कर द्यावा लागतो तो तिथे संपून जाईन. त्यामुळे इतर कोणताही टॅक्स लावता येणार नाही असा खुलासाही मुखमंत्र्यांनी केला. तसंच एलबीटी व्यतिरिक्त डम्पिंग ग्राऊंडच्या प्रश्नाबाबत लवकरच उपाय शोधू असंही ते म्हणाले. याव्यतिरिक्त पीएमपीएमएला सक्षम करण्यासाठी आयएएस अधिकारी नेमणं,पुण्याची सार्वजनिक बससेवा सक्षम करणं आणि पुण्याची पीएमआरडीए सक्षम करणे यासाठी उपाययोजना केल्या जातील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close