नव्या सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे -राज ठाकरे

November 26, 2014 3:49 PM1 commentViews:

raj_abad26 नोव्हेंबर : राज्यात दुष्काळाचीे परिस्थिती भीषण आहे. पण हा दुष्काळ मानवनिर्मित आहे. दरवर्षीप्रमाणे नुसती मलमपट्टी करून उपयोग नाही त्यासाठी ठोस काही तर निर्णय घेतले पाहिजे. नवं सरकार आहे त्यामुळे त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे अशी पाठराखण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसंच शेतकरी मदतीची अपेक्षा ठेवत असतांना खडसेंनी मोबाईलची बिल काढण्याची गरज नव्हती असा टोलाही राज यांनी लगावला. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

विधानसभेत दारुण पराभवानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता कामाला लागले आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राज औरंगाबाद, नाशिक दौर्‍यावर आहे. आज (बुधवारी) औरंगाबादमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. दरवर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होतं असते. पण हे कधी थांबणार आहे ?, हा मोठा प्रश्न आहे. याचा विचार सरकार आणि विरोधकांनी केला पाहिजे. नुसती मलमपट्टी करून फायदा नाही. त्यावर ठोस उपाय निघाला पाहिजे. नव्याने निवडणूक आलेल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या जात आहे. त्यामुळे त्यांना एकदा संधी दिली पाहिजे आणि थोडा वेळ दिला पाहिजे अशी पाठराखण राज यांनी केली.

तसंच त्यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या मोबाईल बिलाच्या विधानाचा समाचार घेतला. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे. अस्मानी संकटाने पुरता खचला आहे. अशावेळी वस्तूस्थितीचं भान राखून असं बोलायला नको होतं. त्यातच विरोधकांनीही टीकेची झोड उठवून दिली. जो शेतकरी मदतीची अपेक्षा ठेवून आहे. त्याच्या समोर तुम्ही भांडणं करत आहात हे बरं नाही असा सल्ला वजा टोलाही राज यांनी लगावला.

यानंतर त्यांनी राज्यातील राजकीय भूमिकेवर भाष्य केलं. सध्या कुणाचा कुणाला पाठिंबा आहे हेच कळत नाही. कोण विरोधात आहे कोण सत्तेत आहे हे कळण जरा कठीणच आहे. राज्याच्या इतिहासात अशी राजकीय परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    मला वाटते की नवीन सरकार ला थोडा वेळ द्यायला हवा , या मताशी बहुतेक जन सहमत असतील पण हे मंत्री लोक आक्षेपार्ह विधाने करून स्वतः बरोबर सरकारला ला ही अडचणीत आणत आहेत त्यांनी अशी विधाने करण्यापेक्षा कामाकडे वेळ द्यायला हवा कारण त्यांच्याकडे वेळ कमी आहे, लोक अगोदरच आघाडी सरकार ला वैतागलेले होते आणी त्यात ह्या लोकांनी अशी विधाने केली तर लोकांची डोकी भडकायला वेळ नाही लागणार.

close