संसार पुन्हा फुलणार, भाजप सेनेसोबत चर्चा करणार !

November 27, 2014 7:31 PM0 commentsViews:

BJP Shivsena27 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपचा मोडलेला संसार पुन्हा एकदा नव्याने फुलणार असं दिसतंय. राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही या अनेक दिवसांपासूनच्या चर्चेला आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णविराम दिलाय. शिवसेना गेल्या 25 वर्षांचा आमचा मित्र असून एनडीएमध्ये सेनेचा सहभाग आहे. त्यामुळे सेनेनं राज्याच्या सरकारमध्ये सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे त्यामुळे उद्यापासून सेनेसोबत चर्चा सुरू करणार असा स्पष्ट खुलासा फडणवीस यांनी केला. सेनेसोबत चर्चेसाठी धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून पूर्ण अधिकार देण्यात आले आहे असंही फडणवीस यांनी जाहीर केलं.

शिवसेना आणि भाजपचा 25 वर्षांचा संसार मोडला. दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यात. पण बहुमताचा जादुई आकडा मात्र हुकला. त्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करावं लागलं. आणि सेनेनं स्वाभिमान बाळगत विरोधीबाकावर बसण्याचा निर्णय घेतला. पण राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यामुळे भाजपचीच कोंडी झाली. त्यामुळेच ‘तुझ्या वाचून जमेना…मला काही करमेना..’अशीच अवस्था भाजपची झाली. अखेरीस भाजपने आता पुन्हा एकदा शिवसेनेकडे हात पुढे केलाय. देवेंद्र फडणवीस म्हणतात, “विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले. पण 25 वर्षं आमची युती होती. केंद्रामध्ये देखील शिवसेनेचा सहभाग आहे. आणि त्यामुळेच साहजिकच कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि महाराष्ट्राच्या जनतेची शिवसेना-भाजप एकत्र आले पाहिजे. आणि दोघांनी मिळून सरकार स्थापन केले पाहिजे. आमची पूर्ण मानसिकता आहे की, सेनेनं सरकारमध्ये सामील झालं पाहिजे. यासाठी उद्यापासून सेनेसोबत चर्चा करणार आहे. दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली होती, त्यांना याची कल्पनाही दिली आहे. उद्या धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील हे दोन नेते या चर्चेला सुरूवात करतील. या दोन्ही नेत्यांना सर्व अधिकार देण्यात आले आहे. वेळप्रसंगी ते माझ्याशी किंवा थेट केंद्रीय नेत्यांशी चर्चा करण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहे.” असं स्पष्ट खुलासा त्यांनी केलाय.

तर परिस्थिती सामान्य नसल्यानं काही अडचण आहे पण शिवसेनेच्या सहभागाबाबत सकारात्मक चर्चा होईल आतापर्यंत रखडलेल्या चर्चेला मुर्त स्वरूप आणणार असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तसंच कोअर कमेटीशी बोलून उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर शिवसेनेचा सत्तेत सहभाग हवा ही भाजपची मानसिकता आहे पण आम्ही विरोधीपक्षनेतेपदाची जबाबदारी प्रामाणीकपणे निभावतोय. जर सत्ते सहभाग घ्यायचाच असेल तर उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील असं सेनेचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

विशेष म्हणजे विधानसभेचा निकाल लागल्यापासून सेना आणि भाजपमध्ये सत्ता सहभागावरुन आतापर्यंत अनेकवेळा चर्चा फिस्कटलीय. राज्यातल्या सत्तेचा निर्णय होत नसल्यानं दोन्ही पक्षांमधला वादही विकोपाला गेला होता. सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेनं ठेवलेल्या मागण्या भाजपनं अनेकदा फेटाळल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेनं विरोधी पक्षात बसणं पसंत केलं होतं. तरीही सेना सत्तेत सहभागी होण्याबद्दलची चर्चा मात्र थांबली नव्हती. आता भाजपनेच संसार थाटण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते हे पाहण्याचं ठरणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close