राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी केली स्वत:चीच जाहीरात

June 29, 2009 2:01 PM0 commentsViews: 11

29 जून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील मुख्य अतिथी असणा-या सुवर्णारंभ सोहळ्यात हर्षवर्धन पाटील यांचा फोटो असलेला भगवा झेंडा नाचवण्यात आला. त्या घटनेमुळे मुख्य सोहळ्याच्या राजशिष्टाचाराला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. हर्षवर्धन पाटील यांचा फोटो असलेला भगावा झेंडा नाचवणारा कला पथक त्यांच्याच गावचा म्हणजे इंदापूरचा होता. हर्षवर्धन पाटील यांचा फोटो असलेला भगवा झेंडा नाचवल्यामुळे भगव्या ध्वजाचा अपमान झाल्याची संतप्त प्रतिक्रिया विरोधकांमधून उमटली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवीवर्षानिमित्त सुवर्णारंभा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचा सोमवारचा दुसरा दिवस होता. सुवर्णारंभ कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी विधानभवनाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याचं आनावरण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. याचवेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या चरित्रग्रंथांचं प्रकाशनही राष्ट्रपतींनी केलं. यावेळी अनेक कार्यक्रम सादर केले गेले. लेझीम, हलगी आणि झांजाच्या नादाने सगळं वातावरणं नादमय झालं. तर दांडपट्टा आणि तलवारीच्या चित्तथरारक कसरती आणि कवायतींनी उपस्थित भारावून गेले होते. त्याचवेळी इंदापूरच्या कलापथकाने सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा फोटो असलेला भगवा झेंडा नाचवल्यामुळे राजशिष्टाचाराला गालबोट लागल्याची घटना घडली. सुवर्णारंभ कार्यक्रमाचं उद्घाटन रविवारी संध्याकाळी एनसीपीएच्या जमशेदजी भाभा सभागृहात झालं. त्यावेळी ' महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे, असे गौरव उद्गार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी काढले. तर कुठल्याही चौकटीत न अडकता महाराष्ट्र ग्लोबल बनेल असा विश्‍वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याकार्यक्रमात व्यक्त केला. सुवर्णारंभ कार्यक्रमास राज्यपाल एससी जमीर, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, देवीसिंह शेखावत यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. या समारंभात महाराष्ट्राचा गौरव सांगणारी संस्कृती आणि पंरपरेचं दर्शन घडवण्यात आलं. लोकसंगीत, लोकनृत्य आणि अस्सल मराठमोळ्या क्रीडा प्रकरांची झलक असणारे कार्यक्रम त्यावेळी सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे जेष्ठ अनेक आमदारांना उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट वक्ता हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसंच जेष्ठ आजी-माजी विधिमंडळ सदस्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

close