शिवसेना-भाजपमध्ये चर्चेचं गुर्‍हाळ सुरूच

November 29, 2014 7:14 PM0 commentsViews:

uddhav_fadanvis29 नोव्हेंबर : शिवसेनेसोबत भाजपने चर्चेला सुरुवात केली खरी पण आज दुसर्‍याही दिवशी कोणताही तोडगा निघाला नाही. शनिवारी रात्री पुन्हा सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेना आणि भाजपच्या शिष्टमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. पण भाजपकडून आपल्याला कुठलाही प्रस्ताव मिळाला नाही. प्रस्ताव आल्यावर उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील असं सेनेचे नेते अनिल देसाई यांनी स्पष्ट केलंय.

भाजपने सेनेला सत्तेत घेण्यासाठी चर्चा सुरू केलीये. पण मागच्या वेळी जे झालं तेच आताही सुरू असल्याचं चित्र आहे. आज केंद्रीय राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सुब्रमण्यम स्वामी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. हिंदुत्त्वाच्या मुद्यावर शिवसेनेनं भाजपसोबत यावं असं मत स्वामी यांनी व्यक्त केलं. तसंच उद्धव यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानी घालणार असल्याचंही स्वामी यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर शिवसेनेबरोबर लाँग टर्म पॉलीसीचा आपण विचार करतोय. फक्त राज्यातंच नाही तर महापालिका आणि जिल्हापरिषदेतही एकत्र लढण्याचा आमचा मानस आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पण भाजपकडून आपल्याला कुठलाही प्रस्ताव मिळाला नाही. प्रस्ताव आल्यावर उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील असं सेनेचे नेते अनिल देसाई यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, शुक्रवारी भाजपने दिलेला नवा प्रस्ताव सुभाष देसाई यांच्यामार्फत उद्धव ठाकरेंना देण्यात आला. त्यानंतर आज सकाळपासून भाजप- शिवसेनेत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. शिवसेनेन केंद्रीय मंत्रिपदाबरोबरच राज्यमंत्रिपदाची मागणीही कायम ठेवलीये. त्याचबरोबर राज्यात देखील गृहमंत्रिपदाबरोबर 10 मंत्रिपदांची मागणी शिवसेनेन कायम ठेवलीय. त्यामुळे आजच्या बैठकीत काय नेमकी चर्चा होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close