‘पश्चिम रेल्वेचं मुख्यालय मुंबईतून हलवण्याचा प्रस्ताव नाही’

December 1, 2014 12:34 PM0 commentsViews:

suresh_prabhu401 डिसेंबर : पश्चिम रेल्वेचं मुख्यालय मुंबईतून हलवण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही असं रेल्वेमंत्रालयानं स्पष्ट केलंय. या विषयावर राजकारण होत असल्याने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीच पत्रक काढून खुलासा केल्यानं आता हा वाद थंड होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील प्रकल्प गुजरातला हलवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा समोर आला. पश्चिम रेल्वेचे मुंबईतील मुख्यालय अहमदाबादला हलविण्यात यावं अशी मागणी लोकसभेत गुजरातमधील खासदारांनी केली होती. गुजरातच्या खासदारांच्या या मागणीमुळे राज्यात तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेनं त्यावर कडाडून आक्षेप घेतला होता. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विरोध केला होता.

केंद्राच्या आखत्यारितील कार्यालयं महाराष्ट्राबाहेर हलवून राज्याला कमजोर करण्याचा डाव असल्याचा घणाघातच राऊत यांनी पत्रात केला होता. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईतून हलवले जाऊ नये यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि त्यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट करावी अशी विनंतीही राऊत यांनी केली होती.

विशेष म्हणजे या अगोदर मुंबईतील रिझर्व्ह बँकेचे तीन महत्त्वाचे विभाग याआधीच दिल्लीकडे वळविले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट तसेच न्हावा शेवा पोर्ट ट्रस्ट येथील जेएनपीटी बंदरातील महत्त्वाची वाहतूक गुजरातकडे वळविण्यात आलीये. नरिमन पॉईंट येथील एअर इंडिया मुख्यालयही जवळ जवळ बंदच करण्यात आले. एअर इंडियाचा कारभार आता मुंबईऐवजी दिल्लीतून हाकला जात आहे. त्यामुळेच शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांना जाब विचारला होता. अखेरीस आज केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पश्चिम रेल्वेचं मुख्यालय मुंबईतून हलवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असा खुलासा केलाय.
 
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close