मराठवाड्यात 3 तर बुलडाण्यात 24 तासांत 2 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

December 1, 2014 9:50 PM0 commentsViews:

01 डिसेंबर : अस्मानी संकटाने खचलेल्या शेतकर्‍यांचं आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. मराठवाड्यात आतापर्यंत 3 आणि बुलडाण्यात 24 तासांत 2 शेतकर्‍यांच्या आत्महत्या केल्या आहेत. हिंगोली,लातूर, अकोला आणि बुलढाण्यात शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

धावत्या रेल्वेखाली उडी मारून जीव यांत्रा संपवली

हिंगोली जिल्ह्यात नापिकीला कंटाळून आणखी एका शेतकर्‍याने आत्महत्या केलीय. धावत्या रेल्वेखाली उडी मारून त्यांनी जीव दिला. वसमत तालुक्यातल्या भेंडेगावच्या नामदेव व्यवहारेंनी नापिकीला कंटाळून जीवन संपवलं. एकत्र कुटुंब असलेल्या व्यवहारेंवर कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांच्याकडे अवघी पावणेदोन एकर जमीन आहे. यंदा त्यांनी शेतात सोयाबीन पेरलं होतं, पण एक पोतंभरसुद्धा सोयाबीनचं पीक हाती न आल्यानं नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी त्याच्या बहिणीचं लग्न झालं होतं. व्यवहारेंची पत्नी गर्भवती आहे, प्रसूतीचा आणि येणार्‍या बाळाचा खर्च कसा भागवायचा हे प्रश्नही त्यांना छळत होते, असं मित्रांनी सांगितलंय.

farmer_suicide3जाळून घेऊन आत्महत्या

दुष्काळ आणि नापिकीने लातूर जिल्ह्यात आणखी एका शेतकर्‍याचा बळी घेतलाय. चाकूर तालुक्यातल्या नांदगाव इथल्या 46 वर्षांच्या संग्राम बेंबडे यांनी स्वतःच्या घरात जाळून घेऊन आत्महत्या केलीय. कर्ज नापिकी आणि 70 हजार रुपये थकीत वीज बिलाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. पत्नी, वृद्ध आईवडील आणि भाऊ असं त्यांचं कुटुंब आहे. पण भावाला काही दिवसांपूर्वी अर्धांगवायू झाल्यानं घराची सर्व जबाबदारी संग्रामवर पडली होती. पण पावसाने दगा दिला, सोयाबीनचं उत्पादन नाही, बँकेचं कर्ज आणि त्यात 70 हजारांचं वीजबिल यामुळे त्यांनी हताश होऊन स्वत:चं जीवन संपवलं.

 बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2 शेतकर्‍यांनी आपलं आयुष्य संपवलंय. दोन्ही शेतकरी कर्जबाजारी होते. शेती पिकविण्यासाठी बँके कडून या शेतकर्यांनी कर्ज घेतले होते. पण सततच्या नापिकीमुळे या शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. बुलढाणा जिल्यातील शिरला नेमाने या गावातील तरुण शेतकर्‍याने विषारी औषध प्रश्न करून आत्महत्या केली त्यांच्याकडे 2 एकर शेती होती. मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील पांडुरंग वाघ या शेतकर्‍याने आपल्याच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्यावर 45 हजार रुपयांचं कर्ज होतं.

अल्पभूधारक वृद्ध शेतकर्‍याची जाळून घेऊन आत्महत्या

नापिकीमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देणे अवघड झाल्याने एका अल्पभूधारक वृद्ध शेतकर्‍याने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना अकोल्यातल्या मनारखेडमध्ये घडली आहे. काशिराम भगवान इंदोरे असं मृत शेतकर्‍याचं नाव आहे. काशीराम इंदोरे यांनी 28 नोव्हेंबरला शेतातच रचलेल्या लाकडांवर बसून लाकडाच्या ढिगाला आग लावून आत्महत्या केली. काशिराम इंदोरे यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांना चार मुले आणि एक मुलगी आहे. त्याचं असल्याने काशीराम इंदोरे व त्यांची पत्नी दोघेच वेगळे राहतात. वय झाल्यानंतरही ते उदरनिर्वाहासाठी मुलांवर अवलंबून नव्हते. नातवंडांना अंगाखांद्यावर खेळविण्याच्या वयात स्वाभिमानी असलेले काशीराम स्वत: चार एकर शेतीत गुजराण करत होते. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे काशीराम यांना पिकाने दगा दिला. उत्पादनात प्रचंड घट आल्याने पेरणीसाठी झालेला खर्चही वसूल झाला नाही.

पायाला विजेची तार बांधून शेतकर्‍यानं संपवलं जीवन

नांदेड जिल्ह्यातल्या काकडी गावात पायाला विजेची तार बांधून एका 33 वर्षांच्या शेतकर्‍यानं जीवन संपवलंय. तुळशीदास मंदलवाड असं या शेतकर्‍याचं नाव आहे. तुळशीदास यांची दोन एकर जमीन आहे. त्यात त्यानं दुबार पेरणी केली. पण दुष्काळामुळे पेरणीचा खर्चही निघू शकला नाही. रब्बीचं पीक तरी येईल या आशेपोटी त्यांनी तयारी केली. पण नोव्हेंबरमध्येच विहिरीनं तळ गाठला. त्यामुळे हताश झालेल्या तुळशीदासनं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. शेतातल्या कृषीपंपाच्या तारा त्यानं आपल्या पायाला बांधून घेतल्या आणि विजेचा प्रवाह सुरू करून जीवन संपवलं. तुळशीदासला चार मुली आहेत. ती घरातला एकमेव कमावती व्यक्ती होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close