अखेर सेना-भाजपमध्ये समझोता, सेना सत्तेत सहभागी होणार

December 2, 2014 7:56 PM0 commentsViews:

20devendra-uddhav02 डिसेंबर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेच्या गुर्‍हाळानंतर अखेर शिवसेना आणि भाजपमध्ये समझोता झालाय. शिवसेना आता सत्तेत सहभागी होणार हे जवळपास निश्चित झालंय.

भाजप शिवसेनेला 5 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रिपदं द्यायला तयार झाली आहे. सेना सत्तेत सहभागी झाली तर सेनेच्या नेते रामदास कदम, नीलम गोर्‍हे, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांना कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे.

एवढंच नाहीतर शिवसेनेला उद्योग, रस्ते विकास, आरोग्य आणि पर्यटन खाती मिळण्याची शक्यता आहे. सेनेशी चर्चा आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे.

गेल्या 25 वर्षांची भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. भाजपने स्वबळावर सर्वाधिक 123 जागा जिंकल्यात पण बहुमताला हुलकावणी दिली. तर शिवसेनेनं त्याखालोखाल 64 जागा जिंकल्यात. पण जागावाटपावरून युती तुटली तिच परिस्थिती सत्तेत सहभागावरून झाली. भाजपने शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला खरा पण खातेवाटपावरून मतभेद झाल्याने भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केलं. आणि सेनेनं विरोधीबाकावर बसणं पसंत केलं. पण राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यामुळे भाजपची गोची झाली. भाजपला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

अखेरीस भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:हून सेनेसोबत चर्चा करणार असल्याचं जाहीर केलं. ठरल्याप्रमाणे मागील आठवड्यात शुक्रवारपासून सेनेसोबत मातोश्रीवर भाजपचे नेते धर्मेंद्र प्रधान आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चेला सुरूवात केली. गेली चार दिवस सेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चेच्या फैर्‍या झडल्यात. सेनेला सत्तेत सहभागाबद्दल किती जागा देणार यावरून चार दिवस खलं सुरू होता.

अखेर काल मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला. भाजपने शिवसेनेला 5 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रिपदं देण्यास सहमती दर्शवली आहे. तसंच सेना सत्तेत सहभागी झाली तर सेनेच्या नेते रामदास कदम, नीलम गोर्‍हे, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांना कॅबिनेट पद मिळणार आहे. एवढंच नाहीतर शिवसेनेला उद्योग, रस्ते विकास, आरोग्य आणि पर्यटन खाती मिळण्याची शक्यता आहे. सेनेनंही या चर्चेवर समाधान व्यक्त केलंय. भाजपसोबत चर्चा सकारात्मक पद्धतीने सुरू आहे. थोड्याच काळात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. स्वत: उद्धव ठाकरे याबद्दल माहिती देतील अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली.

यांना कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता

रामदास कदम
डॉ. नीलम गोर्‍हे
दिवाकर रावते
एकनाथ शिंदे
सुभाष देसाई

राज्यमंत्रिपदं

दादा भुसे
संजय राठोड
विजय आवटी
राजेश क्षीरसागर
गुलाबराव पाटील
रवींद्र वायकर
उदय सामंत किंवा दीपक केसरकर

शिवसेनेला ही खाती मिळण्याची शक्यता

उद्योग
पर्यावरण
उत्पादन शुल्क किंवा वाहतूक
आरोग्य
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास (एमएसआरडीसी)

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close