मराठवाड्यात 5 शेतकर्‍यांची आत्महत्या

December 2, 2014 7:37 PM0 commentsViews:

farmmer02 डिसेंबर : मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आज 5 शेतकर्‍यांची आपली जीवन यात्रा संपवलीये. लातूरमध्ये एकाच दिवसात 3 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. तर अकोला बुलडाण्यातही नापिक आणि कर्जाच्या बोज्याला कंटाळून शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

लातूरमध्ये आज एकाच दिवसांत 3 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्यात. 50 वर्षांच्या भैरवनाथ देशमुख यांनी आत्महत्या केलीये, त्यांच्यावर बँकेचं 4 लाख रुपयांचं कर्ज होतं. तर उमरगा तालुक्यात 50 वर्षांच्या बाळू मामाळे या शेतकर्‍यानं आत्महत्या केलीये. त्यांच्या 5 एकर शेतात उभा ऊस पाणी न मिळाल्यानं जळून गेला होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. ऊस जळाला आणि त्यात त्यांना 3 मुलींच्या लग्नाची चिंताही होती त्यामुळेच त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. तिसरी घटना निलंगा तालुक्यातल्या अंबुलगा बुद्रुक या गावात घडलीये. 48 वर्षांच्या गोविंद कांबळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीये. त्यांच्याकडे 6 एकर शेती होती, मात्र त्यामध्ये काहीच पिकलं नाही. त्यामुळे नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केली. तर उस्मानाबाद जिल्ह्यात जयदेव भोसले या शेतकर्‍यानं आत्महत्या केलीये. भोसले यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केलीये. उस्मानाबाद तालुक्यातील कोंड गावातली ही घटना आहे. सोमवारी मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केली.

बीड जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणानं आणखी एका शेतकर्‍याचा बळी घेतलाय. वडवनी तालुक्यात पिंपळखेड या गावात एका 40 वर्षांच्या शेतकर्‍यानं आत्महत्या केलीये. भगवान निपटे असं त्यांचं नाव आहे. आज दुपारी शेतामध्ये विषारी औषध पिऊन त्यांनी आयुष्य संपवलं. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे ते निराश झाले होते.

अमरावती जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍याने आत्महत्या केलीये. चांदूर बाजार तालुक्यात घाटलाडकी इथं 42 वर्षीय संदीप नागले या शेतकर्‍यानं विष पिऊन आत्महत्या केली

हिंगोली शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठवाड्यात दुष्काळाचे चटके दिवसेंदिवस तीव्र होत आहे. शासनाकडून मोठमोठ्या घोषणा जरी केल्या जात असल्या तरी शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. हिंगोली जिल्ह्यात ही परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. नापिकी…कर्जाच्या परतफेडीची चिंता आणि मुलीच्या लग्नाच्या चिंतेने कळमनुरी तालुक्यातल्या सेलसुरा गावातले शेतकरी मुंजाजी पिराजी कंठाळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. विषारी औषध पिऊन त्यांनी जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती गंभीर आहे. हिंगोलीतल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येतायत. कठाळे यांच्याकडे 2 एकर जमीन आहे. पण यावर्षी पीक आलेलं नाही. त्यात त्यांच्यावर बँकेचं 45 हजारांचं आणि खासगी 15 हजारांचं कर्ज आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close