राष्ट्रवादीचं आता विरोधीबाकावर लक्ष !

December 3, 2014 7:06 PM0 commentsViews:

navab_malik03 डिसेंबर : शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येत असल्याचं पाहुन राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीने आता विरोधी पक्षनेतेपदासाठी तयारी सुरू केलीये. विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलीये. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सर्व प्रक्रियेला सुरूवात करणार असल्याचंही मलिक यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणूक सर्वच पक्षांनी स्वबळावर लढल्यामुळे चांगलीच रंगत आली. मात्र या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. भाजपने सर्वाधिक 123 जागा जिंकल्यात. पण बहुमताने हुलकावणी दिल्यामुळे भाजपला पाठिंब्याची गरज पडली. हीच संधी साधून निकालाच्या दिवशीच राष्ट्रवादीने ‘सरकार स्थिर राहावे’ असं सांगून भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. शरद पवार यांच्या या अचानक भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण मिळालं. पण राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा की नाही यावरून भाजपमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी सुरू केली. पण खातेवाटपावरून भाजप आणि सेनेचा वाद विकोपाला गेला. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन विश्वासदर्शक ठराव जिंकला. पण ज्यांना विधानसभेच्या आखाड्यात ज्यांच्यावर टीका केली त्यांचा पाठिंबा घेतल्यामुळे भाजपने जनतेची नाराजी ओढावून घेतली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने सेनेलासोबत घेण्याची तयारी सुरू केली. अखेरीस भाजपला यात यश मिळाले असून सेना सत्तेत सहभागी होणार आहे. सेना सहभागी होणार असल्यामुळे साहजिकच राष्ट्रवादी बाजूला पडणार होती. त्यामुळे आता राष्ट्रवादीने संख्याबळाचा दावा करत विरोधीपक्षनेतेपदावर दावा केलाय. राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्यात तर काँग्रेसने 42 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. संख्याबळानुसार शक्य असणार्‍या सर्व पदांवर दावा करणार आहोत. हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे सात तारखेला तसं लेखी पत्र विधानसभा अध्यक्षांकडे देणार आहोत असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close