साध्वींमुळे भाजपची कोंडी, लोकसभेत विरोधकांचा राडा सुरूच

December 5, 2014 2:38 PM0 commentsViews:

bjp vs congress3405 डिसेंबर : केंद्रीय राज्य मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वक्तव्यावरून आजही लोकसभेत गोंधळ सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवेदन करूनही विरोधकांनी साध्वी यांच्या राजीनाम्याची मागणी लावूनच धरली आहे. मोदींनी आज पुन्हा एकदा निवेदन सादर करून कामकाज सुरळीत चालू द्यावं अशी विनंती केली. पण तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने विनंती धुडकावून लावत निदर्शनं केली. तर विरोधकांच्या विरोधात निषेध करण्यासाठी आता सत्ताधारी भाजपचे खासदारही मैदानात उतरले आहे.

‘मुस्लीम आणि ख्रिश्चन ही रामाची मुलं आहेत, ज्यांना ही गोष्ट मान्य नाही ते भारतीय नाहीत’ असं वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय अन्नप्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्यामुळे भाजपची लोकसभेत चांगलीच कोंडी झालीये. गेल्या तीन दिवसांपासून तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसच्या खासदारांनी भाजपला धारेवर धरलंय. साध्वी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साध्वींची कानउघडणी करत मंत्र्यांना माफ करावं आणि लोकसभेचं कामकाज सुरळीत पार पडू द्या अशी विनंती केली होती. पण विरोधाकांनी यावरही असमाधान व्यक्त केलं. आज लोकसभेच्या कामाला सुरूवात झाली. तृणमूलच्या खासदारांनी पुन्हा साध्वींच्या विरोधात घोषणाबाजी केली. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांसोबत काँग्रेसचे खासदारही सहभागी झाले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीही या निषेधात सहभागी झाले होते. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी एकत्र येत हे आंदोलन केलं. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुका होईपर्यंत भाजपने साध्वी निरंजन ज्योतींना पक्षाच्या सभा आणि रॅलीजपासून दूर ठेवायचं ठरवल्याचं सूत्रांकडून समजतंय. तर दुसरीकडे विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू देत नाहीत याचा निषेध म्हणून भाजपच्या खासदारांनीही संसदेसमोरच्या गांधीजींच्या पुतळ्यापाशी आंदोलन केलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close