शपथविधी पार, युतीच्या संसाराला सुरूवात

December 5, 2014 6:31 PM0 commentsViews:

sena_bjp_shaptvidhi05 डिसेंबर : तब्बल 15 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज शिवसेनेसाठी तो दिवस उजाडला. शिवसेनेच्या आमदरांचं मंत्रिपदाची शपथ घेण्याचं स्वप्न साकार झालंय. विधानभवनाच्या प्रांगणात पहिल्यांदाच शपथविधी सोहळा पार पडलाय. यावेळी शिवसेनेच्या 5 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली तर भाजपच्या 5 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पण या शपथविधीकडे महायुतीचे घटकपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर अनुपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तर सपेशल या शपथविधीकडे पाठ फिरवली.

अखेर भाजप आणि शिवसेनेचा संसार पुन्हा एकदा फुललाय. सत्तेत सहभागाच्या घोषणेनंतर आज ठरल्याप्रमाणे युती सरकारचा छोटेखानी शपथविधी सोहळा विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला.  शपथ घेण्याचा पहिला मान हा भाजपला मिळाला. पुण्यातील कसबा पेठचे भाजपचे आमदार गिरीष बापट यांनी सर्वात पहिले कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी शपथ घेतली. रावते यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे गिरीश महाजन, गिरीश बापट, चंद्रशेखर बावनकुळे, बबन लोणीकर, राजकुमार बडोले या कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, रामदास कदम, दिवाकर रावते, सुभाष देसाई, डॉ. दीपक सावंत या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी झाला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करत शपथ घेतली. तर राजकुमार बडोले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन करुन शपथ घेतली. शपथ घेताना त्यांनी आपल्या आईच्या नावाचा उल्लेख केला. भाजपचे राम शिंदे यांनी अहिल्याबाई होळकर यांचं स्मरण केलं. अगोदर सर्व कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देण्यात आली त्यानंतर राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आलीये. यावेळी शिवसेनेच्या 5 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली तर भाजपच्या 5 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे.मात्र भाजप सरकारचे असलेले घटक पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर अनुपस्थित होते. फक्त रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. सर्व घटकपक्षांना नेत्यांना रितसर आमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र खातेवाटपात स्थान न दिल्याची नाराजी घटकपक्षांच्या अनुपस्थितवरून दिसून आली. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओ.पी.माथुर, धमेंद्र प्रधान, पियुष गोयल हे केंद्रीय नेते उपस्थित होते. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि उपसभापती वसंत डावखरे उपस्थित होते.

भाजपचे कॅबिनेट मंत्री

1) गिरीश महाजन
- आमदारकीची सहावी टर्म
- जळगावच्या जामनेर मतदारसंघातून आमदार
- भाजपचे राज्य उपाध्यक्ष
- पहिल्यांदाच मंत्रिपद
- पक्षाची विविध स्तरांवर जबाबदारी

2) गिरीष बापट
- भाजपचे जेष्ठ नेते
 – पाचव्यांदा आमदार
 – पश्चिम महाराष्ट्रात भाजप संघटनेत मोठी भूमिका

 3) चंद्रशेखर बावनकुळे
- आमदारकीची तिसरी टर्म
- नागपूर ग्रामीण – कामठी प्रतिनिधित्व
- नागपुरात भाजपच्या अनेक समित्यांवर
- काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या आणि दलित आणि मुस्लीम मताधिक्य असलेल्या कामठीतून विजयी
- तेली समाजाचे नेते
- महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प बावनकुळे यांच्या मतदारसंघात

4) राजकुमार बडोले
- पूर्व विदर्भात भंडारा-गोंदिया जिल्ह्याचं प्रतिनिधित्व
- आमदारकीची तिसरी टर्म
- अर्जुनी मोरगावहून आमदार
- पोवार समाजाचा नेता?

5) बबनराव लोणीकर (मराठवाडा)
- परतूरचे आमदार
- भाजपकडून तीनदा आमदारकी
 जालन्याचे भाजप जिल्हाध्यक्ष -
 विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचे निकटवर्तीय –
आघाडी सरकारच्या सिंचन घोटाळ्यांवर अनेक आंदोलनं

भाजपचे राज्यमंत्री

1) रणजित पाटील
- राज्य सरचिटणीस भाजप
- विधान परिषदेवर आमदार
- आमदारकीची पहिली टर्म
- पश्चिम विदर्भातलं नेतृत्व
- उच्चशिक्षित
- अभ्यासू नेता म्हणून ओळख

2) अंबरिश आत्राम
- नाग विदर्भ समितीचे अध्यक्ष
- वेगळ्या विदर्भाचा कट्टर समर्थक
- यावेळी भाजपच्या चिन्हावर लढवली निवडणूक
- घराण्यात राजकीय वारसा
- आमदारकीची पहिली टर्म
- तरुण नेतृत्व
-अहेरीतलं राजघराणं
 
3) विजय देशमुख
- आमदारकीची दुसरी टर्म
- सोलापूर जिल्ह्याचे आमदार
- पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व
- कर्नाटकी देशमुख समाजाचे प्रतिनिधित्व
4) राम शिंदे
- धनगर समाजाचे नेते
- अहमदनगरच्या कर्जत – जामखेडचे दुसर्‍यांदा आमदार
- भाजपचे प्रदेश सरचिटणीस
- धनगर समाजाचे नेते
- भाजपचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष

5) प्रवीण पोटे
- विधानपरिषदेवर आमदार
- उद्योजक म्हणून ओळख
- भाजपला अपक्षांचा पाठिंबा मिळवून देण्यात मोठी जबाबदारी

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री

 1) एकनाथ शिंदे
- शिवसेना विधिमंडळ गटनेते
- आमदारकीची तिसरी टर्म
- ठाणे-कोपरी पाचपाखाडीचे आमदार
- आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना बळकट राखण्यात महत्त्वाचा वाटा
- मातोश्रीचे अत्यंत विश्वासू म्हणून गणना
 2) रामदास कदम
- माजी विरोधी पक्षनेते
- नारायण राणेंच्या बंडखोरीनंतर कोकणात सेनेचा आवाज बुलंद ठेवला
- शिवसेनेचा आक्रमक चेहरा

 3) दिवाकर रावते-
- ज्येष्ठ शिवसेना नेते
- आक्रमक नेते म्हणून ओळख
- विधान् ापरिषदेत सेनेचा आवाज बुलंद ठेवला
-विदर्भात कापूस दिंडी काढून सत्ताधार्‍यांच्या नाकीनऊ

4) सुभाष देसाई
- माजी विधिमंडळ गटनेते
- मातोश्रीचा वरदहस्त
5) डॉ.दीपक सावंत
- सध्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार
- शिवसेनेच्या माध्यमातून राज्यभर अनेक आरोग्य मोहिमा राबवल्या
- शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका
- मातोश्रीचे विश्वासू

शिवसेनेचे राज्यमंत्री

1) दीपक केसरकर
- राष्ट्रवादीतून केली बंडखोरी
- लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंविरोधात भूमिका घेत शिवसेनेत प्रवेश
- विनायक राऊत यांना विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका
- विधानसभा निवडणुकीत कोकणातून सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे शिवसेना आमदार
- शिवसेना कोकणात मजबूत करण्यात महत्त्वाची कामगिरी
- आमदारकीची दुसरी टर्म
- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार

 2) विजय शिवतारे
- आमदारकीची दुसरी टर्म
- पुरंदर हवेली मदारसंघाचं प्रतिनिधित्व
- घराण्यात राजकीय वारसा नाही
- आक्रमक आमदार म्हणून ओळख
- पाण्यासाठी अनेक आंदोलनं

3) रवींद्र वायकर
- आमदारकीची चौथी टर्म
- मुंबई महापालिकेचं स्थायी समिती अध्यक्षपद भूषवलं
- जोगेश्वरी मतदारसंघातून आमदार

4) संजय राठोड
- दारव्हा दिग्रज मतदारसंघाचे आमदार
- आमदारकीची तिसरी टर्म
- बंजारा समाजाचे नेते
- अनेक शेतकरी आंदोलनामंध्ये सहभाग
- घराण्यात राजकीय वारसा नाही

5) दादा भुसे
- मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार
- आमदारकीची तिसरी टर्म
- शिवसेनेचा ग्रामीण भागातला चेहरा

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close