नांदा सौख्य भरे, साखरपुड्यात लग्न उरकून केली दुष्काळग्रस्तांना 1 लाखांची मदत

December 5, 2014 6:58 PM0 commentsViews:

solapur_marridge05 डिसेंबर : लग्नसोहळ्यांवर अनावश्यक खर्च करणार्‍या परिवारांसाठी सोलापुरातल्या मोरे आणि क्षीरसागर कुटुंबियांनी नवा आदर्श घालून दिलाय. शाही विवाहसोहळ्यावर होणारा खर्च टाळून तोच पैसा राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा नवा पायंडा या परिवारांनी पाडलाय. या नव विवाहित जोडप्याने साखरपुड्यात लग्न उरकून दुष्काळग्रस्त भागासाठी एक लाखांचा निधी दिला. सामाजिक बांधिलकीतून लखपती परिवारांनी घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

वधू सौजन्या…अक्कलकोट तालुक्यातील द्राक्ष बागायतदार आणि पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मोरे यांची वधू कन्या…तर वर आहेत पुणे आणि सोलापुरातील निमच्ती या नामांकीत कंस्ट्रक्शन कंपनीच्या क्षीरसागर परिवारातील सदस्य संदीप…संदीप आणि सौजन्या दोघंही उच्च शिक्षित आणि सदन परिवारातील वधू-वर असल्याने 29 जानेवारीला त्यांचा शाही विवाह होणार होता. मात्र साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांनी आलेली गर्दी लक्षात घेवून साखरपुड्यातच विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब मोरे यांनी एक लाख रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला. त्याचा दोन्ही पक्षांकडून समंती मिळाली त्यामुळे एक आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.

घरच्या आर्थिक स्थितीमुळे साखरपुड्याच्या मंडपात येईपर्यंत ज्यांनी हौस-मौज केली त्या संदीप आणि सौजन्या यांनीही मग वडिलधा-यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. मग भला मोठा मंडप नाही,बँड-डाँल्बी नाही, वरात नाही, शाही वस्त्रप्रावरणे नाहीत अशा वातावरणात हा विवाह सोहळा अत्यंत साधपणानं पार पडला. त्याबद्दल वधूवरांना विचारल्यावर त्यांनी खर्च टाळून गरीबांना होणारी मदत हीच आपल्यासाठी मोलाची असल्याची प्रतिक्रिया दिली.

विवाहाची ही नवीन संकल्पना अक्कलकोटच्या तहसीलदारांना कळविण्यात आली. त्यामुळे शासनाचा प्रतिनिधी म्हणून तहसीलदारही
वर्‍हाडी म्हणून हजर झाले. मग आमदार आले. बघता-बघता राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यंवरांनी या विवाह सोहळ्यात गर्दी केली अन् वधू-वरांना आशिर्वाद दिले. या विवाहातून शिल्लक राहिलेल्या पैशांचा चेक तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close