छत्तीसगडमध्ये पोलीस पथकावर नक्षलवाद्यांचा हल्ला : 31 शहीद

July 12, 2009 3:10 PM0 commentsViews: 1

12 जुलै छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी रविवारी पुन्हा एकदा मोठा हल्ला केला. त्यात पोलिसांचे 31 जवान शहीद झाले. त्यात एका पोलीस अधिक्षकांचाही समावेश आहे. तर पोलीस उपनिरीक्षक मात्र या हल्ल्यातून सुदैवानं बचावलेत. या हल्ल्यात इतर अनेक जण जखमी झालेत. छत्तीसगडमधल्या राजनंदगावात ही घटना घडली. मुख्यमंत्री रमण सिंग यांच्या मतदारसंघात हा भाग येतो. पोलीस जात असलेल्या मार्गात नक्षलवाद्यांनी स्फोटकं आणि लँडमाईन्स पेरले होते. त्याचा स्फोट होऊन 31 पोलीस ठार झाले. सीआरपीएफचे 600 जवान घटनास्थळी पाठवण्यात आलेत. छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये नक्षलवादी हल्ल्यांच्या घटना वारंवार घडत असतात. यापूर्वीच्या काही घटनांवर एक नजर- जूनमध्ये छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी CRPF चे जवान प्रवास करत असलेल्या ट्रकचा स्फोट घडवला होता. त्यात 11 जवान शहीद झाले होते. एप्रिलमध्ये झारखंडमधल्या लतेहार जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवलेल्या लँडमाईनच्या स्फोटात बीएसएफचे सहा जवान शहीद झाले होते. 21 एप्रिल रोजी बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचे चार हल्ले झाले. नक्षलवाद्यांनी झारखंडमधल्या बारकाना ते मुगलसराईला जाणा-या ट्रेनवर हल्ला केला. आणि त्यातल्या 700ते 800 प्रवाशांना ताब्यात घेतलं होतं.तर फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगडच्या कानकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हल्ला केला . त्यात CRPF चे तीन तर पोलिसांचे नऊ जवान शहीद झाले होते.

close