होऊ दे अधिवेशन; आता युतीची बारी, काँग्रेस-राष्ट्रवादीही एकवटले !

December 7, 2014 10:30 PM0 commentsViews:

adhiveshan_sena_vs_bjp07 डिसेंबर : 15 वर्षांच्या तपानंतर युती सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलंय. आता शनिवारपासून युती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. खर्‍या अर्थाने युती सरकारची उद्या कसोटी लागणार आहे. आज या अधिवेशनला बहिष्काराने सुरूवात झाली असून अधिवेशन वादळी होणार याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संकेत दिले आहे.

राज्याचं हिवाळी अधिवेशन शनिवारपासून सुरू होतंय. 2 आठवडे हे अधिवेशन होणार आहे. राज्यात पंधरा वर्षांनंतर सत्तेत आलेल्या युती सरकारचं हे पहिलंच मोठं अधिवेशन असणार आहे. सेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे हे सरकार स्थिर आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदाशिवाय हे अधिवेशन असणार आहे. तरी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एका प्रकारे एकत्र येऊन युती सरकारविरोधात आघाडी उघाडलीये. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय. मुख्यमंत्री उपस्थित नसल्यामुळे राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांवर टीका करत चहापानाचा निषेध केला. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसनेही मुख्यमंत्र्यांवर टीका करत चहापानावर बहिष्कार टाकला. मात्र, दिल्लीत पंतप्रधानांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमुळे मुख्यमंत्री या बैठकीला हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. मात्र, राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्री दिल्लीला बैठकीला गेले होते, असं राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. दरवर्षी येणारे शेकडो मोर्चे आणि धरणं आंदोलनं ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची वैशिष्ट्यं असतात. यंदाही ती परंपरा सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे सत्तेतून पायउतार झालेल्या काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत मोर्चाचे आयोजन केलंय. यंदाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने जे पूर्वीचे सत्ताधारी आता विरोधकाची भूमिका वठवणार आहे तर जे विरोधक होते ते सत्ताधार्‍याची भूमिका निभावणार आहे त्यामुळे अधिवेशन कसं होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

अधिवेशनातले मुद्दे

- भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या
– कापूस, ऊसाच्या हमीभावाचा मुद्दा
– कापूस, सोयाबीन आणि धानाच्या शेतकर्‍यांना मदत
– प्रादेशिक असमतोलावरचा केळकर समितीचा अहवाल
– एलबीटीच्या मुद्द्यावरून सरकारचं घूमजाव
– नव्या टोल धोरणासंबधीचा प्रश्न
– विकासकामांसाठीच्या निधीला मोठ्या प्रमाणावर कात्री

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close