जेष्ठ अभिनेते निळू फुले यांचं निधन

July 13, 2009 7:52 AM0 commentsViews: 8

पुणे 12 जुलै ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचं दीर्घ आजाराने सोमवारी पहाटे 2 च्या सुमारास निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सकाळी अकरा वाजता वैकुंठस्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अन्ननलिकेचा कॅन्सर बळावल्यांनं 5 जुलैला त्यांना पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. निळू फुले म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्रीतली अभिनयाची चालती बोलती शाळा. मराठी सिनेमात खलनायक म्हणून त्यांनी चार दशकं राज्य केलं. सामना, पिंजरा, जैत रे जैत , मशाल यासारख्या अनेक सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. सिंहासनमधली त्यांची पत्रकाराची भूमिका 'माईलस्टोन'च ठरली. निळू फुलेंचा जन्म 1931 मध्ये झाला. मित्रपरिवाराच्या पाठिंब्यामुळे लहानपणापासुनच त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. लोकनाट्यापासून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास पुढे तसाच सुरु राहिला.आणि 1968 मध्ये त्यांनी चित्रपट क्षेत्रात पाउल ठेवलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून बघितलंच नाही. आज पर्यंत 170 चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. बेरकी आणि राजकारणी बाजाच्या त्यांच्या भूमिकांना रसिकांनी नेहमीच भरभरून दाद दिली. सिनेमात खलनायकाची भूमिका करणारे निळू फुले यांचा अनेक सामाजिक कार्यात, चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. अंधश्रद्धा निर्मुलनासाठीही त्यांनी काम केलं होत. सिनेमांमध्ये त्यांची वेगळी भूमिका होती. एक होता विदुषकमध्येही निळू फुलेंनी काम केलं होतं. सखाराम बाइंडर नाटकातली त्यांची भूमिका अजरामर ठरली. महेश टिळेकरांचा गाव तसं चांगलं हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.

close