बळीराजाला कुणी वाली नाही!, दुष्काळप्रश्नी सरकारची टोलवाटोलवी सुरूच

December 9, 2014 11:31 PM0 commentsViews:

indian farmer09 डिसेंबर : महाराष्ट्रात दिवसेंदिवस दुष्काळाची परिस्थिती आणखी भीषण होत चाललीये. हातची पिकं डोळ्यादेखत जळून गेल्यामुळे
शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे पण याबद्दल अजूनही सत्ताधार्‍यांना जाग आली नाही असं दिसून येतंय. दुष्काळ जाहीर करण्यास राज्य सरकारला उशीर झाला असा घरचा अहेर केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी राज्य सरकारला दिला. तर राज्य सरकारने आपली जबाबदारी अगोदरच केंद्रावर ढकलले आहे.

महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा प्रश्न आज लोकसभेत गाजला. केंद्र आणि राज्यानं जबाबदारी एकमेकांवर ढकललीय. महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करायला उशीर केला, असा घरचा अहेर केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी राज्य सरकारला दिलाय. दुष्काळ जाहीर करण्याची जबाबदारी राज्याचीच आहे, असंही सिंग यांनी स्पष्ट केलं. राज्याला मदत देण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याच्याची ग्वाहीही सिंग यांनी दिली. तसंच केंद्राची टीम 14 नोव्हेंबरपासून दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करणार आहे असं स्पष्ट करून टाकलं. याचवेळी दुष्काळाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी केंद्रावर तोफ डागली. आत्महत्या थांबवण्यासाठी केंद्र सरकार काय करणार आहे, असा सवाल काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी विचारला. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिलेलं उत्तर हे संवेदनाहीन असल्याचं सांगत महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी खासदारांनी लोकसभेत सभात्याग केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close