उदयनराजे यांचं बेताल वर्तन : दिल्लीत मागितली माफी

July 15, 2009 1:47 PM0 commentsViews: 18

15 जुलै न्याय मिळत नसेल तर पक्ष गेला खड्‌ड्यात अस बेधुंद विधान खासदार उदयनराजें भोसले यांनी मंगळवारी साता-यात केलं. उदयनराजेंनी जाहीरपणे केलेल्या बेताल विधानांबद्दल आयबीएन लोकमतनं जेव्हा आज बातमी दाखवली तेव्हा त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. माझ्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असं ते म्हणाले.साता-यातील राजे प्रतिष्ठानच्या कार्यालयाची दोन महिन्यांपूर्वी तोडफोड करण्यात आली होती. यासंदर्भात संशयित आरोपी संतोष जाधव याचं वकिलपत्र घेतलं म्हणून ऍड. विक्रम पवार यांना मारहाण झाली होती. खा. उदयनराजे यांच्याशी संबधीत राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनीच ऍड. पवार यांना मारहाण केल्याचा आरोप बार असोसिएशने केला होता. त्याविरोधात वकिलांनी मोर्चाही काढला होता. मात्र, हे आरोप खोटे असल्याचं सांगत, उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेउन जिल्हा प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आपल्या खास शैलीत अनेकांना गंभीर इशारे दिले. त्याचबरोबर बार असोसिएशनलाही धमकी दिली. या पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी जिल्हा प्रशासन आणि बार असोसिएशनलाही चांगलाच दम भरला. उदयनराजे पक्षाविरोधात काही बोलण्याची शक्यता नाही. असं गृहमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय. उदयनराजे बेसावध असताना पत्रकारांनी त्यांना गाठलं असावं, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.तर उदयनराजे हे राष्ट्रवादीनं स्वतःवर ओढवून घेतलेलं संकट आहे अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

close