अवघ्या जगाच्या साक्षीने दोन शांतीदूतांचा गौरव…

December 10, 2014 8:30 PM0 commentsViews:

 Kailash Satyavarthi & Malala received NobelPeacePrize 10 डिसेंबर : आशिया खंडातील दोन देश…एक भारत आणि दुसरा पाकिस्तान…या दोन देशांचे दोन शांतीदूत…भारतातल्या मुलांची गुलामगिरीतून सुटका करून घेण्यासाठी ‘बचपन बचाओ आंदोलन’च्या माध्यमातून काम करणारे कैलास सत्यार्थी आणि पाकिस्तानात स्वतःच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी तालिबानशी लढा देणारी मलाला युसुफझाई…नावं जशी तशी त्यांची कारकिर्द…आज अवघ्या जगाच्या साक्षीने या दोन शांतीदूतांचा अदभुत असा नोबेल पुरस्कार प्रदान सोहळा शांतीची भूमी नार्वेत दिमाखात पार पडला.

आजचा दिवस भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक ठरला. बालमजुरांसाठी ‘बचपन बचाओ आंदोलन’च्या माध्यमातून काम करणारे सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी आणि पाकिस्तानाची कन्या मलाला युसुफझाई या दोघांना शांतेतेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॉर्वेमध्ये ओस्लो इथं शानदार समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. पहिल्यांदाच असा शांतीदूतांच्या सन्मानाचा सोहळा ‘याची देही याचा डोळा’ अवघ्या जगाने डोळ्यात साठवला. सत्यार्थी यांनी सर्वांचे आभार मानत ‘दुनियाभर के मेरे प्यारे बच्चे’ असं म्हणत हिंदीतून भाषणाला सुरूवात केली. पहिल्यांदाच ओस्लोच्या या सभागृहात एका भारतीयाचा आवाज हिंदीतून घुमला. यावेळी बोलताना कैलाश सत्यार्थी यांनी महात्मा गांधी, गौतम बुद्ध आणि मार्टिन ल्युथर किंग यांचं स्मरण केलं. तसंच त्यांनी मलालाचं कौतुक करत मलालाही माझी मुलगीच आहे असं भावनाही व्यक्त केली. सत्यार्थी यांनी नोबेल सन्मानाचं श्रेय कालुकुमार आणि बालहक्कासाठी इतर बळी गेलेल्या सहकार्‍यांना अर्पण केलं.

तर मुलांना मुलांसारखंच जगता यावं हे माझं आयुष्याभराचं एकच ध्येय आहे, त्यांना हसता- खेळता यावं, शाळेत जाता यावं, त्यांना पोटभर खायला मिळावं आणि त्यांना स्वप्न बघण्याचं स्वातंत्र्य असावं अशी इच्छा मलालाने व्यक्त केली. आपण सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे असं आवाहनही तिने केलं.तसंच मलालानं आपल्याला लढायला शिकवणार्‍या आईचे आभार मानले. या सोहळ्यात पाकिस्तानचे गायक राहत फतेह अली खान यांनी गाणं सादर केलं. तर भारताचे सरोदवादक अमजद अली खान आणि त्यांच्या मुलांनी सरोदवादन सादर करून उपस्थितांची मन जिंकली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे सत्यार्थी आणि मलालाचं अभिनंदन केलं. पंतप्रधान म्हणतात, ‘संपूर्ण भारताला तुमच्या कार्याचा अभिमान आहे. ओस्लोमधल्या गौरव सोहळा हा भारताच्या गौरवात भर टाकणारा असाच आहे. आम्ही सर्वजण आनंदानं आणि उत्साहानं हा गौरव सोहळा पाहतोय.’ आशियाखंडातील पाकिस्तान आणि भारत नेहमी विरोधात असतात पण आज या दोन शांतीदूतांच्या गौरव सर्व वाद विसरावे असाच होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close