राज्यात हुंडा अत्याचाराच्या दोन घटना उघड

December 11, 2014 8:39 AM0 commentsViews:

Dowry

11 डिसेंबर :  देशभरात महिलांचा विनयभंग, लैंगिक छळ, बलात्कार, अपहरण, पळवून नेणे, हुंडा प्रतिबंधक कायदा, पती-पत्नीच्या नातेवाइकांकडून छळ, हुंड्यासाठी खुनाचा प्रयत्न आदी गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. राज्यातही काहीशी तशीच परिस्थिती आहे. पनवेल येथे हुंड्यासाठी एका गर्भवती महिलेचा बळी घेण्यात आला आहे. याप्रकरणी पती महेश खैरे आणि सासूला अटक करण्यात आली आहे. पती आणि सासूने केलेल्या मारहाणीत गौरी खैरे यांचा मृत्यू झाला. वर्षभरापूर्वी पनवेलच्या पारगावमध्ये राहणार्‍या महेश खैरे यांचा गौरीशी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून 50 हजारांच्या हुंड्यासाठी गौरीचा मानसिक आणि शारीरिक छळ होत होता. दोन दिवसांपूर्वी याच कारणावरून गर्भवती असलेल्या गौरी खैरेंना बेदम मारहाण करण्यात आली आणि याचं दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गौरीचे वडील गणेश सोनावणे यांनी पनवेल पोलीस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात गौरीचा पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे इंदापूर येथेही हुंड्यासाठी एका पोलिसाने आपल्या गर्भवती पत्नीचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदापूर येथील तावशी या गावात राहणार्‍या पीडित मुलीचा नारायण भारत काळे याच्याशी जुलै महिन्यात विवाह झाला होता. विवाह झाल्यापासूनच पतीसह तिच्या सासरच्या इतर लोकांनी, माहेरहून कार, फ्रीज, वॉशिंग मशीनची मागणी करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. शेवटी कार घेण्यासाठी तिच्या वडिलांनी त्यांची जमीनही विकण्याची तयारी दाखवली.

या दरम्यान, पीडित महिलेला दिवस गेले पण हुंडा न आणल्यानं तिच्या सासरच्यांना हे मूल नकोस झालं. त्यामुळे फिरायला न्यायचा बहाण्याने या महिलेचा गर्भपात करवण्यात आला. हा सगळा प्रकार कळताच तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी बारामतीच्या वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली आहे. या प्रकरणी तिच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे, मात्र अद्याप कुणालाच अटक झालेली नाही. आरोपी नारायण काळे हा पुण्याच्या हडपसर पोलीस चौकीत कार्यरत आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close