पुन्हा जीवघेण्या गारा !

December 12, 2014 11:28 PM0 commentsViews:

hailstorm_north_maha 12 डिसेंबर : अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचं होतं नव्हतं हातचं नेलं…बळीराजा हवालदिल झाला असून मराठवाडा, विदर्भात आत्महत्येचं सत्रं सुरू आहे. एवढं पुरे की नाही तेच पुन्हा एकदा जीवघेण्या गारपिटीने बळीराजाच्या वेदनेवर आग ओकली आहेत. धुळे, नाशिकसह सोलापुरला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले आहे.

मेंढ्या, बकर्‍या, कोंबड्या मृत्युमुखी

गेल्या वर्षभरात अस्मानी संकटाने बळीराजा पुरता हैराण झालाय. अगोदर गारपीट आणि त्यानंतर अवकाळी पाऊस. त्यात भरात भर म्हणजे भीषण पाणीटंचाई. शेतकर्‍यांच्या वेदनवर फुंकर मारण्यासाठी राज्य सरकारने कालच 7 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, राज्य सरकारच्या घोषणेनं सुखावलेल्या शेतकर्‍यांच्या आनंदावर गारपिटीने पाणी फेरले. उत्तर महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसलाय. गारपीटीमुळे द्राक्ष, डाळिंब आणि कांदा पिकाचं मोठ्ठं नुकसान झालंय.

मनमाड, येवला तालुक्यांना मोठा फटका बसलाय. येवला तालुक्यातल्या भाटगाव गायके वस्तीत गारपिटीमुळे मेंढ्या, बकर्‍या, कोंबड्या मृत्युमुखी पडल्यात. शेकडो क्विंटल कांदा भिजून सडला आहे. तर वडनेर भैरवमध्ये शेतीचं नुकसान झालंय. मालेगाव तालुक्यातल्या तरवाडेमध्ये डाळींबाच्या बागा उद्‌ध्वस्त झाल्यात. कांदा, मका पिकाला गारपिटीनं झोडपून काढलंय. निफाडलाही गारपिटीचा फटका बसलाय. दरम्यान, धुळे शहर, धुळे तालुका आणि साक्री तालुक्यात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी आल्यात.

लिंबाएवढ्या गारा

तर नाशिक जिल्ह्यात मनमाड, येवला, सटाणा या तालुक्यांमध्ये गारपीटीमुळे मोठं नुकसान झालंय. सटाण्यात तर गारांचा मार लागून 20 शेतमजूर जखमी झाले आहेत. अक्षरश: लिंबाएवढ्या गारा पडल्यात. त्या मजूर जखमी झालेत. त्यांना वडनेर खाकुर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलंय. मालेगाव आणि बागलाणमधल्या शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास गारपिटीनं हिरावून घेतलाय. वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीनं डाळींब, कांदा, मका आणि भाजीपाला पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. मालेगावमधल्या तळवाडे भामेरमध्ये तर बागलाण तालुक्यातील लखमापूर, वासोळ मध्ये पिकांचं झालेलं नुकसान पाहून बळीराजाच्या डोळ्यात पाणी येतंय. ताराबाई पवार यांच्या कुटुंबानं अंगावरचं सोनं विकून, कर्ज काढून डाळिंबाची बाग उभारली होती. आता हे कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न त्यांना पडलाय. सरकारनं गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत करावी अशंी रास्त अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

सोलापूरला अवकाळी पावसाने झोडपले

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालंय. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्यामुळे मातीमोल झालाय. तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही शेतकर्‍यांनी आणलेला शेकडो पोती कांदा भिजलाय. त्यामुळं कांद्याचे भाव पडले आहेत. 2 हजारानं जाणार्‍या कांद्याला आता 700 रुपये दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतंय. सोलापूर हे लासलगावनंतर कांद्याचं मोठं मार्केट समजलं जातं. आज इथं सहाशे पोत्यांची आवक झालीये. मात्र रात्री अचानक आलेल्या पावसामुळं उघड्यावर असलेला शेकडो पोती कांदा भिजलाय.त्यामुळे आज कांद्याचे लिलाव पडत्या पावसांत अन् चिखलात पार पडले. दुसरीकडे भिजलेल्या काद्यांचे दर कोसळले असून शेतकर्‍यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close