जगाने अनुभवलं शतकातलं सर्वात मोठं खग्रास सूर्यग्रहण

July 22, 2009 7:29 AM0 commentsViews: 4

22 जुलै शतकातल्या सगळ्यात मोठ्या खग्रास सूर्यग्रहणाचा आनंद अवघ्या जगानं लुटला. करोडो लोक या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार ठरले. भारतातही वाराणसी, कुरूक्षेत्र, अलाहाबाद आणि सूरत या ठिकाणी सूर्यग्रहणाचा रम्य सोहळा अनुभवता आला. याठिकाणी मुख्यत: ग्रहणाची खग्रास स्थिती अनुभवता आली. हळू हळू चंद्राने सूर्याला व्यापलंं आणि तयार झालेल्या झळाळत्या डायमंड रिंगनं खगोलप्रेमींचे डोळे दिपले. सकाळी साधारण साडे पाचच्या सुमारास ग्रहणाला सुरूवात झाली. त्यानंतर पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आलेल्या चंद्राच्या सावलीनं सूर्य हळू-हळू झाकोळत गेला. अगदी सूर्योदय होत असतानाच ग्रहण लागलं, त्यामुळे तिमीर- तेजाचा आगळावेगळा अविष्कार या निमीत्तानं सगळ्यांनी अनुभवला. महाराष्ट्रातही सूर्यग्रहण पाहण्यासाठी नंदूरबारमध्ये गर्दी झाली होती. पण ढगाळ हवामानामुळे तिथे पूर्ण ग्रहण दिसू शकलं नाही. मात्र ग्रहणाच्या वेळी झालेला अंधार जमलेल्या खगोलप्रेमींना अनुभवता आला. उत्तर भारतातल्या लखनौमधेही नागरिकांनी सुर्यग्रहण अनुभवलं. 6 मिनिटं 39 सेकंद हा सूर्य ग्रासण्याचा कालावधी होता. शतकातल्या या सगळ्यात मोठ्या सूर्यग्रहणासाठी लखनौवासीयांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. आकाशात ढगाळ वातावरण असलं, तरी सूर्य उगवतानाच चंद्राच्या सावलाने त्याच्यावर आक्रमण केल्यामुळे पुन्हा सगळीकडे अंधार झाला होता. साधारण पावणेसहाच्या सुमारास, सूर्य अंशत:झाकोळला गेला होता. त्यानंतर मात्र वेगानं येणारं नभांगण आणि सावल्यांचा खेळ चालूच राहिला. त्यातूनही ग्रासलेला सूर्य दिसतच होता. चंद्रकोरीसारखी सूर्याची अवस्थाही मोहवून टाकणारी होती. त्यानंतर हळूहळू ग्रहण सुटत गेलं.

close