एका फिलॉसॉफर डॉक्टरची ‘अतुल’निय भरारी !

December 13, 2014 10:39 PM0 commentsViews:

atul_gawandeअजय कौटिकवार, मुंबई

13 डिसेंबर : भारतीय वंशाचे अमेरिकनं डॉक्टर अतुल गावंडे यांच्या `बिईंग मॉर्टल` या पुस्तकाची जगातल्या सर्वोत्तम 100 पुस्तकांमध्ये निवड झालीये. या पुस्तकाचं मुंबईतही प्रकाशन झालं. एक अपॉइंटमेट….अमेरिकनं आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणार्‍या या भारतीय डॉक्टरशी.

डॉ. अतुल गावंडे…कॅन्सर सर्जन आणि जगभरात गाजणार्‍या चार `बेस्ट सेलर` पुस्तकांचे लेखक. अमेरिकेमध्ये या भारतीय डॉक्टरची ओळख आहे. फिलॉसॉफर डॉक्टर ! मेडिकल सायन्समध्ये आजार बरा करण्यासाठी सगळं काही शिकवलं जातं. पण आपला आजार स्वीकारून, त्याच्यावर मात करत मृत्यूला शांतपणे कसं सामोरं जाता येईल, ही संकल्पना त्यांनी मांडलीय. ‘बिईंग मॉर्टल’मध्ये…

डॉ. अतुल गावंडे म्हणतात, ‘मेडिकलमध्ये सर्व शिकवलं जातं मात्र शेवट सुखात व्हावा यासाठी काही शिकवलं जात नाही सुखी राहण्यासाठी गरज आहे संवेदनेची.’

कॅन्सर, ह्रदयरोग अशा दुर्धर आजारांमध्ये माणसं उन्मळून पडतात. जीवन नकोसं होतं. मात्र या काळात उपचारांबरोबरच आपल्या जीवाभावाची माणसं जपणं, त्यांच्या सहवासात रहाणं, साहित्य…कलांमध्ये रमणं असं केलं तर आयुष्य नक्कीच वाढतं. हे सांगताना डॉ. गावंडेंनी त्यांच्या वडिलांची एक आठवणही सांगितली. ते म्हणतात, ‘ब्रेन ट्युमरमुळे वडिलांना आपण जास्त जगणार नाही याची जाणीव झाली शेवटच्या काळात ते कुटूंब, मित्र आणि आपल्या लोकांमध्ये राहिले त्याचा त्यांना फायदा झाला’.

या आधी डॉ. गावंडेंची `द चेकलिस्ट मॅनिफेस्टो, `बेटर` आणि `कॉम्लिकेशन्स` ही सर्व पुस्तकं प्रचंड गाजली. ‘द न्युयॉर्क’ या मासिकामध्ये ते 1998 पासून स्तंभलेखन करतात. `पब्लिक हेल्थ` वरचे त्यांचे अनेक संशोधनपर लेख गाजले आहेत. बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांचे आरोग्य सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलंय.

यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड जवळचं उटी हे डॉ.अतुल गावंडेंचं मुळं गाव. त्यांचे वडिल डॉ.आत्माराम गावंडे हे 1960 च्या दशकात अमेरिकेत गेले होते. 6 दशकांच्या अमेरिकेच्या वास्तव्यानंतरही डॉ.अतुल गांवडेंची आपल्या गावाशी नाळ अजूनही कायम आहे. उमरखेडमधल्या कॉलेजला ते सातत्यानं मदत करतात. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं हा त्यांचा उद्देश आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close