मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गारपीटग्रस्तांच्या भेटीला

December 14, 2014 12:26 PM0 commentsViews:

cm in nashik

14 डिसेंबर : गेले 2 दिवस पडलेल्या अवकाळी पावसाच्या आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (रविवारी) गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. दिंडोरी, चांदवड, आणि निफाड तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. तर दुसरीकडे नाशिकच्या दौर्‍यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरेही गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष आणि डाळिंबांच्या बागांचं मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्तांनी मदत जाहीर केल्यानंतर दोनच दिवसांत गारपिटीला सुरुवात झाली आहे. तर गारपीटग्रस्तांना मदत होण्यासाठी पंचनामे योग्य पद्धतीनं होण्याची गरज असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल (शनिवारी) नाशिकमध्ये बोलताना राज ठाकरेंनी वेधशाळांच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

गारपिटीमुळे नाशिकमध्ये 38 हजार एकर क्षेत्र बाधित झालं असून याचा 362 गावांना फटका बसला आहे. द्राक्षं, डाळिंब, बोर आणि कांदा उत्पादकांचं कंबरडंच मोडलं आहे, द्राक्षाच्या बागाच्या बागा आडव्या झाल्या आहेत. या नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मका, सोयाबीन या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे गारपिटीमुळे शेतकरी पार उद्‌ध्व्स्त झाला असून अखेर आज मुख्यमंत्री पाहणी दौरा करणार आहेत. आपल्या पाहणी दौर्‍यात मुख्यमंत्री शेतकर्‍यांना काय मदत जाहीर करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close