गारपीटग्रस्ताच्या पाहणीऐवजी महसूलमंत्री चित्रपट पाहण्यात दंग

December 14, 2014 11:54 AM1 commentViews:

khadse watching movie

14 डिसेंबर :  आपल्या बेताल वक्तव्यांमुळे सरकार स्थापनेपासून कायम चर्चेत राहिलेल्या महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसेंनी आपल्या वर्तणुकीने पुन्हा एकदा सरकारला अडचणीत आणले आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल असताना शनिवारी खडसेंनी शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्याऐवजी ‘ओ तुनी माय…’ अहिराणी चित्रपट पाहात आपले मनोरंजन करून घेणे पसंत केले. आमदार

एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे आमदार सुरेश भोळे, गुरुमुख जगवाणी, जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर आणि इतर अधिकार्‍यांनीही या चित्रपटाचा आनंद लुटत शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले. खडसेंच्या या कृतीमुळे पुन्हा भाजप सरकारची प्रतिमा खालावली असून, ऐन विधानसभा अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिले आहे. त्यामुळे सोमवारपासून विरोधक या घटनेवर सरकारची पुरेपूर कोंडी करणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

विशेष म्हणजे ‘राज्यात 19 हजार गावे दुष्काळी असल्याने मंत्र्यांनी संवेदनशीलपणे वागावे’, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असतांना खडसेंची आजची ही कृती मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत त्यांनाच आव्हान देणारी ठरली आहे. खरंतर महसूलमंत्री उत्तर महाराष्ट्राचेच असल्याने त्यांनी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी किमान बैठक घेणं अपेक्षित होतं.मात्र असंवेदनशीलपणा दाखवत खडसेंनी चक्क चित्रपटाचा आनंद घेतल्याने ‘अजब तुझे सरकार’ असंच म्हणावं वाटतंय…दरम्यान या प्रकरणी काँग्रेससह राष्ट्रवादीने टीका केली असून, खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • umesh jamsandekar

    sarakaarala adachanit aananyaachi janu supaarich ya gadakari saahebaani ghetaleli disatey, mukhyamantri honyaach tyaanch du:kh te ajun wisaralele naahit.

close