गारपीटग्रस्तांना उद्याच पॅकेज जाहीर करू – मुख्यमंत्री

December 14, 2014 5:55 PM0 commentsViews:

Fadnavis
14 डिसेंबर : नाशिकमध्यल्या गारपीटग्रस्तांना उद्याच पॅकेज जाहीर करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. अधिवेशन सुरू असल्याने कोणतीही घोषणा करता येत नाही. मात्र उद्या सभागृहात याबाबतचं मदत जाहीर करणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं आहे.

नाशिक मधील शेतीवर गारपीटीचे संकट मोठे कोसळलं आहे. हे शेतकर्‍यांचं सरकार आहे. सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे, असं म्हणत त्यांनी शेतकर्‍यांना धीर धरण्याचं आवाहन केलं.
तसंच नवी फळ, पीक विमा योजना आणण्याचं आश्वासनही फडणवीसांनी दिलं आहे. या पहाणी दौर्‍यात द्राक्षबांगाचं जवळजवळ शंभर टक्के नुकसान पहायला मिळालं, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तुमच्याकडे कर्जवसुलीचा तगादा लावला जाणार नाही. तुम्हाला पुढच्या हंगामासाठी पीककर्ज मिळेल याची व्यवस्था करण्यात येईल. तातडीने आर्थिक साह्य देण्यात येईल. त्यासाठी उद्या नागपुर येथे विधीमंडळाच्या अधिवेशनात घोषणा केली जाईल, असेही ते पुढे म्हणाले.

गारपीट हा निसर्गनिर्मित आहे. त्यावर उपाय नाही. मात्र त्यातुन होणारे नुकसान कमीत कमी होईल यासाठी दिर्घकालीन उपाययोजना सरकार करण्याचा विचार करेल. शेटडनेट हा त्यावर पर्याय असुन दौर्‍यात एका शेतकर्‍याने आपल्या 80 टक्के बागेवर शेडनेट केले होते. तीथे काहीही नुकसान झाले नाही. ज्या वीस टक्के भागात शेडनेट करायचे राहिले तेथे शंभर टक्के नुकसान झाले. त्यामुळे त्या पर्यायाचा स्विकार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

गेल्या दोन दिवसांत गारपीटीमुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष आणि डाळींब उत्पादकांचे मोठे नुकसान झालं आहे. यात असंख्य बागा उध्वस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आज मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली आणि नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेही उपस्थित होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close