खटला थांबवून शिक्षा देण्याची कसाबची मागणी कोर्टानं फेटाळली

July 23, 2009 3:18 PM0 commentsViews:

23 जुलै खटला थांबवून शिक्षा देण्याची अजमल कसाबची मागणी कोर्टानं फेटाळली आहे. या खटल्याची पूर्ण सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं आज सांगितलं. या खटल्याचा चौथा दिवसही नाट्यमय घडामोडींचा ठरला.गेल्या चार दिवसांत अजमल कसाबनं मुंबई हल्ल्यातल्या अनेक रहस्यांचा उलगडा केला. गुन्हा कबूल केला आणि खटला बंद करून फाशी देण्याची मागणी केली. पण अखेर कोर्टानं खटला सुरूच ठेवण्याचा निर्णय दिला. विशेष न्यायाधीश एम. एल. तहलियानी यांनी आपल्या आदेशात म्हटलंय कि- ' कोर्टानं लावलेले सर्व गुन्हे कसाबनं कबूल केले नाहीत. त्याच्यावर 86 आरोप आहेत. पण त्यानं गुन्ह्याची अंशत: कबुली दिलीय. कसाबचा नोंदवलेला जबाब हा रेकॉर्डवर घेण्यात येईल. त्याच्या विनंतीवर योग्य वेळी विचार करण्यात येईल. 'कोर्टात आणखी एक नाट्य पाहायला मिळालं. कसाबचे वकील अब्बास काझमी यांचं म्हणणं होतं- 'कसाबनं माझ्याशी चर्चा करणं बंद केलंय. त्यामुळे या केसमधून बाहेर पडण्याची माझी इच्छा आहे.'न्यायाधीशांनी कसाबला प्रश्न विचारला – 'हे खरं आहे ? 'त्यावर कसाबनं सांगितलं – ' जर त्यांना स्वतःला असं वाटत असेल तर तो वेगळा मुद्दा आहे. पण माझा अजून त्यांच्यावर विश्वास आहे. 'त्यानंतर हा मुद्दा सोडवण्यात आला. आणि अब्बास काझमींनी आपण कसाबचं वकिलपत्र कायम ठेऊ असं सांगितलं. मुंबई हल्ल्याच्या सुनावणीला 68 दिवस झालेत. पुढच्या सुनावणीत 135 साक्षीदारांचा जबाब नोंदवला जाणार आहे. दरम्यान, या खटल्यात साक्ष देण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच FBI च्या अधिका-यांना समन्स बजावावा, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी केली. पण एफबीआयच्या अधिका-यांची नावं गुप्त ठेवण्याची विनंती अमेरिकच्या सरकारने केली आहे. अशी माहितीही निकम यांनी दिली. या खटल्यात काही अमेरिकन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचीही गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

close