लोकलच्या धडकेनं गँगमनचा मृत्यू

December 15, 2014 7:07 PM0 commentsViews:

thane_accident15 डिसेंबर : ठाणे ते मुलुंड दरम्यान गँगमनला लोकलची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. महादेव स्वामी (54) नामक कर्मचार्‍याच्या मृत्यू नंतर संतप्त झालेल्या रेल्वे कर्मचारी संघटनेने ठाण्याहून मुंबईकडे तसंच कल्याणकडे जाणार्‍या गाड्या रोखून धरल्याने काहीकाळ लोकल वाहतूक खोळंबली होती. दर महिन्याला अपघातात असे दोन कर्मचारी मृत्यू पावत असल्याने रेल्वे प्रशासनाचा धिक्कार करून कर्मचार्‍यांच्या सुरक्षेबाबत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी संघटनेनं केली.

ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान कोपरी पुलाजवळ महादेव स्वामी सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास इतर कामगारांसह रेल्वेमार्ग देखभालीचे काम करीत होते. तेव्हा,स्वामी यांना धावत्या लोकलची धडक बसली. या अपघातात त्यांचे दोन तुकडे होवून जागीच मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या रेल्वे कामगारांनी फलाट क्रमांक दोन आणि तीनवर रेल रोको करून आंदोलन केले. यामुळे तब्बल दीडतास लोकल वाहतूक विस्कळीत होवून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने चाकरमानी प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाकडे कामगारांची वानवा असून नवीन भरतीही करीत नाहीत. रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम रात्री करून घेतातच पण,दिवसाही करून घेतात. स्वामी हे दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आजच कामावर रुजू झाले होते. पण,रेल्वेकडून कुठलीही सुरक्षाव्यवस्था नसल्याने लोकलने त्यांचा बळी घेतला असा आरोप कामगार करीत होते. अखेर,रेल्वेच्या अधिकार्‍यांनी संतप्त कामगारांची समजूत काढल्याने सायंकाळी चार वाजल्यानंतर लोकल वाहतूक सुरळीत झाली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close