साहेब, प्यायला पाणी नाही, पिकं जळाली; आता आम्ही काय करायचं ?

December 15, 2014 8:48 PM0 commentsViews:

aur_farmer15 डिसेंबर : आमच्या सर्व बागा जळाल्या आहेत,कापूस जळून गेला, सहा महिन्यांपासून प्याला पाणी नाही तर आम्ही शेतीला कुठून पाणी देणार ?, टँकरवाल्यांकडून पाणी घ्यायचो पण त्यांनाही पाण्याचे पैसे देण्यासाठी आमच्याकडे काही नाही…घरं कसं बसं चालवतोय दुसरीकडे रोजंदारी करतोय अशी कैफियत मांडली शेतकर्‍यांनी…आता या बळीराजाला आशा आहे ती केंद्राकडून मदतीची…पण या आजच्या या दौर्‍यात शेतकर्‍यांचा आक्रोश आणि कैफियतीने केंद्रीय पथकही सुन्न झाले.

वर्षभर शेतात राबणार शेतकरी आपल्याच हाताने फुलवलेली शेती डोळ्यासमोर जळतांना पाहून मेटाकुटीला आलाय. जीवापाड जपलेली पिकं जमीनदोस्त होतांना पाहून शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आलंय. विदर्भ आणि मराठवाड्यात दररोज शेतकरी मृत्यूला कवटाळतोय. शेतकर्‍यांचं दु:ख दूर सारण्यासाठी राज्य सरकारने 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. पण पॅकेज जरी जाहीर केलं त्याची अंमलबजावणी आणखी बाकीच आहे. उलट राज्य सरकारने केंद्राकडून आणखी मदतीची अपेक्षा ठेवली आहे. त्यामुळे आज पासून केंद्रीय पथकाने दुष्काळ,अवकाळी आणि गारपीटग्रस्त भागाची पाहणी सुरू केलीये. पण या पाहणीत आहेत शेतकर्‍यांचा आक्रोश आणि कैफियत…

आज केंद्र सरकारच्या दुष्काळ पाहणी समितीचा आजपासून दौरा सुरू झालाय. एका पथकाने पैठणमध्ये पाहणी केली. या पथकानं दुष्काळी भागाची पाहणी करून तिथल्या शेतकर्‍यांच्या व्यथाही जाणून घेतल्या. या पथकापुढे शेतकर्‍यांनी आपली कैफियत मांडली. हातचं सर्व पिकं जळून गेलंय. डोक्यावर दीड लाखांचं कर्ज आहे. आम्हालाच प्यायला पाणी नाही तर शेतीला कुठून देणार ? असा सवाल करतांना शेतकर्‍यांना अश्रू अनावर झाले. दुसरं पथक आज जालनामध्ये होते. तर एका पथकानं बीडच्या गेवराईमध्ये पाहणी केली हे पथक राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्र सरकारला अहवाल सादर करेल. या अहवालानुसार, केंद्र सरकार मदतीचा निर्णय घेणार आहे.

तर दुसरीकडे आणखी एका केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकानं बीडमध्येही पाहणी केली. गेवारी तालुक्यातील कुंभार वाडी येथील डाळिंब उत्पादक शेतकर्‍याच्या बागेची पाहणी करून शिरूर तालुक्यातील तिन्तरवनी येथील कपाशी उत्पादक शेतकर्‍याच्या शेताची पाहणी पथक प्रमुख प्रवेश शर्मा आणि त्यांच्या सहाकारी वंदना सिंघल यांनी केली. या वेळी या पथकान शेतकर्याशी संवाद साधत दुष्काळ आणि पिक पद्धत यावर चर्चा केली. या पथक दौर्‍यात जिल्हाधिकारी तसंच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या दौर्‍यात किमान 20-25 शासकीय गाड्या , अधिकारी कर्मचारी आणि पथकातील अधिकारी होते. अधिकारी कुंभारवाडी येथील बागायतदार शेतकर्‍याच्या डाळिंबाची बाग पाहतात आणि शेतकर्‍यांबरोबर संवाद साधतात यात ते शेतकर्‍यांशी संवाद साधताना बाजरीच्या पिकावरून थेट डाळिंबाची बाग कशी घेतली अशीच सुरुवात केल्यान शेतकरी चांगलेच बुचकळ्यात पडले आणि सुरु झाली कृषी विभागातील अधिकार्याची चुळबूळ सुरू. पण आतापर्यंत असे अनेकदा दौरे झाले आणि त्यानंतर हातात फारसं काही पडलं नाही. त्यामुळे यावेळी तरी दिलासादायक मदत मिळू दे, अशी अपेक्षा हे शेतकरी व्यक्त करत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close