‘घरट्या’साठी आजीबाई धावल्या आणि जिंकल्या…!

December 15, 2014 8:58 PM0 commentsViews:

14 डिसेंबर : जिद्द आणि चिकाटीने ध्येयप्राप्ती करणं अशक्य नसतं, हे 67 वर्षांच्या लता करे आजींनी दाखवून दिलंय. बारामतीतल्या शरद मॅरेथॉन स्पर्धेत 67 वर्षांच्या लता करेंनी ज्येष्ठांच्या गटात पहिलं स्थान पटकावलंय. सलग दुसर्‍या वर्षी त्या या स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या आहेत.

त्या आल्या…त्यांनी पाहिलं आणि त्या जिंकल्या…असंच काहीस 67 वर्षांच्या आजीबाई लता करे यांच्याबाबत म्हणावे लागेल. 67 वर्षांच्या लता भगवान करे यांनी सलग दुसर्‍या वर्षी शरद मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला. नुसता भाग घेतला नाही तर प्रथम क्रमांकही पटकावलाय. ज्येष्ठांसाठीच्या गटात पहिल्या आलेल्या लता करेंनी कसलंही व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेलं नाही. उलट त्यांची परिस्तिती अत्यंत हलाखीची आहे. गेल्या वर्षी लताताई त्यांच्या पतीच्या हृदयविकाराच्या उपचारांच्या खर्चासाठी धावल्या होत्या, तर या वर्षी घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि स्पर्धा पूर्ण केली. लता करेंचं कुटुंब बुलडाण्याचं आहे, पण कसल्याच सोयीसुविधा मिळत नसल्यानं त्या बारामतीतल्या पिंपळीमध्ये पतीसोबत राहायला आल्या आहेत. लाल रंगाची साडी नेसून, पायात शूजही नसताना लताताई अगदी वार्‍याच्या वेगानं धावतात. लताताईंच्या जिद्दीचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close