ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर यांचं निधन

July 26, 2009 7:18 AM0 commentsViews: 9

26 जुलैज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर यांचं पुण्यात कॅन्सरनं रविवारी पहाटे निधन झालं. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं. मात्र या जीवघेण्या आजारातून ते वाचू शकले नाहीत. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूसमयी ते 73 वर्षांचे होते.वेगळ्या धाटणीचे संगीतकार म्हणून कायम चंदावरकर ओळखले गेले.एक प्रयोगशील संगीतकाराचा हा मृत्यू मनाला चटका लावून जाणारा आहे.ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या निधनाने संगीतक्षेत्र एका उत्तम संगीतकाराला मुकला आहेच, पण सतारीचे सूरही त्यांच्या जाण्याने पोरके झालेयत. रवी शंकर यांच्या पत्नी अन्नपुर्णा देवी यांच्याकडून त्यांनी सतारवादनाचं शिक्षण घेतलं. चित्रपट आणि संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन करणा-या जगातल्या मोजक्या जाणकारांमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. संगीतामध्ये अनेक नवनवीन प्रयोग त्यांनी केलं. विशेष म्हणजे प्रभा मराठेंच्या दोन नृत्य नाटिकांसाठी दोन तासांचं दिलेलं संगीत चांगलंच गाजलं. त्यांनी ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या घाशीराम कोतवाल या नाटकालाही संगीत दिलं. यानंतर एक उत्तम संगीतकार म्हणून ते प्रकाशझोतात आले. संगीतकार म्हणून घाशीराम कोतवालच्या यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यानंतर त्यांचा सामना हा सिनेमा चांगलाच गाजला. सामनामधली त्यांची गाजलेली गाणी रसिक श्रोते कधीच विसरू शकणार नाहीत. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे याच सिनेमातलं गाणं. भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीताचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी जगभर व्याख्यानं दिली. संगीतातले उत्तम जाणकार, देशी वाण सांभाळणारा पण परदेशी संगीताची जाण असणारा संगीतकार आज आपल्यातून निघून गेलाय. पण त्यांचं संगीत काळाच्या कसोटीवर चिरंतन राहणार आहे.

close