भारत-पाक संयुक्त निवेदनाचं पंतप्रधानांनी केलं समर्थन

July 29, 2009 5:00 PM0 commentsViews: 9

28 जुलै,विरोधकांच्या सर्व आरोपांना उत्तर देत भारत-पाक संयुक्त निवेदनाचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेत बुधवारी समर्थन केलं. भारत आणि पाकिस्तानने इजिप्तमध्ये सही केलेल्या संयुक्त निवेदनावर लोकसभेत वादळी चर्चा झाली. सरकार देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करतंय, असा थेट आरोप करत विरोधकांनी केला आणि थेट पंतप्रधानांवरच हल्ला चढवला. पण विरोधकांच्या आरोपांनी पंतप्रधानांनी शांतपणे उत्तर दिलं. अटल बिहारी वाजपेयींनी पाकिस्तानशी सुरू केलेल्या शांतता प्रक्रियेचा उल्लेख करून ते म्हणाले की पाकिस्तानवर विश्वास ठेवत चर्चा करत राहणं. हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. चर्चेला सुरूवात करत भाजपचे यशवंत सिन्हा म्हणाले- की संयुक्त निवेदनात केलेला बलुचिस्तानचा उल्लेख ही भारतासाठी कायमची डोकेदुखी ठरणार आहे. संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव म्हणाले की दहशतवादाचा मुद्दा सर्वसमावेशक चर्चेपासून अलग करणे चुकीचे आहे. आणि असं करण्यास काँग्रेसच्याही कित्येकांचा विरोध आहे. तर सरकारला पाठिंबा देत असलेल्या मुलायम सिंग यांनी चक्क हे संयुक्त निवेदन कच-याच्या टोपलीत टाकायचा सल्ला पंतप्रधानांना दिला. पंतप्रधानांनी स्पष्ट केलं की भारताने दहशतवादाबाबतची भूमिका अजिबात मवाळ केली नाही. जोवर पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करत नाहीत. तोवर सर्वसमावेशक चर्चा सुरू होणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. बलुचिस्तानविषयी लपवण्यासारखं काहीच नसल्याने आम्ही त्यासकट कोणत्याही विषयावर चर्चा करायला तयार आहोत, असंही पंतप्रधान म्हणाले.

close