पाकिस्तानला आता तरी जाग येईल का ?

December 17, 2014 11:11 PM0 commentsViews:

pakistan_2nd_day17 डिसेंबर : पाकिस्तानमधील पेशावरमधल्या आर्मी स्कूलमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर आज दुसर्‍या दिवशी पाकिस्तानमध्येच नाही तर जगभरात शोकाकुल वातावरण आहे. पण त्याचबरोबर आता हे किती दिवस सहन करायचं असा प्रश्न पाकिस्तानी नागरिक विचारत आहेत. पाकिस्तानमधून तालिबान्यांचं समूळ उच्चाटन करायची गरज आहे या निर्धाराने पाकिस्तान एकवटलाय. पेशावरचा हा हल्ला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी मोहिमेला वेगळं वळण देणारा ठरलाय.

तालिबान्यांनी किती निष्ठुरपणे निष्पाप मुलांचा बळी घेतला असेल याची साक्ष देणारी ही मन हेलावून टाकणारी दृश्यं..पाकिस्तानवर आजवर झालेल्या हल्ल्यांपैकी हा अतिरेकी हल्ला सर्वात भीषण होता. संपूर्ण देश या हल्ल्यानं सुन्न झालाय.

शाळांपासून, कार्यालयांपर्यंत…गल्लीबोळांपासून ते पाकिस्तानी संसदेपर्यंत सगळीकडे आज मातम होता. सगळीकडे हल्ल्यातल्या बळींना श्रद्धांजली वाहण्यात येत होती.

अतिरेकी हल्ले पाकिस्तानसाठी नवे नाही. पण, या हल्ल्यानं पाकिस्तान पुरता हादरलाय. हल्ल्याच्या 24 तासांनंतर लष्करानं पत्रकारांना घटनास्थळी जाऊ दिलं आणि तिथली भीषणता जगापुढे आली.

या आर्मी स्कूलपासून जवळच असलेल्या गव्हर्नर हाऊसमध्ये पाकिस्तानातले सर्वपक्षीय नेते एकत्र आले आणि त्यांनी चर्चा केली.
तालिबान्यांबरोबर कटु-गोड संबंध ठेवणार्‍या सर्वच पक्षांना या हल्ल्यानं एकत्र आणलं. पंतप्रधान नवाज शरिफ यांनी अतिरेक्यांच्या फाशीवर घातलेली बंदी रद्द केली.

भारतातही संसदेपासून शाळांपर्यंत सर्वांनी एकत्र येत पाकिस्तानच्या दु:खात आपणही सहभागी असल्याचा संदेश दिला. ट्विटरवरही हॅशटॅग इंडिया दिवसभर ट्रेंड होत होतं. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दोन्ही सभागृहात निवेदन वाचून दाखवलं.

पाकिस्तानी लष्करानं तालिबान्यांविरोधात ‘झर्ब-ए-अझ्ब’ मोहीम उघडलीय. त्याचाच सूड उगवण्यासाठी तालिबान्यांनी हा हल्ला घडवला. पण, हल्ल्यामुळे तालिबान्यांचा बिमोड करण्याचा निर्धाराला अधिक बळ मिळालंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close