‘बालचित्रवाणी’ मोजतेय अखेरीच घटका !

December 18, 2014 10:43 PM1 commentViews:

अद्वैत मेहता, पुणे

18 डिसेंबर : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना हसतखेळत विविध विषयांचं ज्ञान सोप्या पद्धतीनं देता यावं या उद्देशानं सुरू असलेली बालचित्रवाणी ही संस्था सरकारी अनास्थेमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. गेले तब्बल 9 महिने बालचित्रवाणीच्या 40 कर्मचार्‍यांना वेतनंच दिलं गेलं नाहीये. संस्थेकडून केली जाणारी शैक्षणिक कार्यकर्मांची निर्मिती ठप्प पडलीये. सरकारी वाहिनी दूरदर्शनवरून दररोज होणारं अर्ध्या तासाचं प्रक्षेपणही बंद पडलंय.याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट..

…1984 साली महाराष्ट्रासह देसात 6 राज्यात केंद्र सरकारनं बालचित्रवाणीची स्थापना केली. सुमारे 30 वर्ष सुरू असलेला अत्यंत महत्वाचा शैक्षणिक उपक्रम अक्षरश: शेवटच्या घटका मोजतोय. स्थापनेनंतर 5 वर्षांनी राज्य शासनाने संस्थेची पूर्ण जबाबदारी घ्यायची असा निर्णय झाला होता. पण महाराष्ट्र सरकार गेली 25 वर्ष ही जबाबदारी टाळतेय असा आरोप होतोय. सध्या संस्थेत कार्यरत असलेल्या 40 कर्मचार्‍यांना गेले 9 महिने वेतनच दिलं गेलं नाही. बालचित्रवाणीचं दूरदर्शनवरचं प्रक्षेपण 12 फेब्रुवारी 2014 पासून बंद झाल्याने प्रकल्प निर्मिती ही ठप्प झालीय. एकीकडं पोपडे उडालेल्या भिंती..जळमटं असं वातावरण आहे तर अद्यावत स्टुडिओ… कॅमेरे-एडिटिंगची सामुग्री वापराविना पडून आहे.

संस्थेच्या सर्व समित्यांवर राज्य शासनाचे मंत्री, सचिव, अधिकारी आहेत. ही संस्था सुस्थितीत ठेवणं ही खरं तर सरकारची जबाबदारी आहे. राष्ट्रीय स्तरावर बालचित्रवाणीनं अनेक पारितोषिकं पटकावलेली आहेत. बालचित्रवाणीचे कार्यक्रम दूरदर्शनवर दररोज न चुकवता पाहिले जायचे.जुन्या कार्यक्रमाच्या सीडी,व्हीसीडी ना बाजारात मागणी होती. बालदोस्ताचे मातृभाषेतून मनोरंजन करत शैक्षणिक विकास घडवणार्‍या प्रकल्पाला पुनर्जिवत करायची आवश्यक आहे. मराठीचा पुरस्कार करत सत्तेत आलेले राज्यकर्ते आणि राजकारणी मंडळी यांनी हे मनावर घेतले तर नक्कीच हे अशक्य नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Jai Maharashtra

    Raj Thackeray..Kahitari Bola..Bhumika Ghya..Ha Mudda Aplya Pakshacha Agenda shi Nigadit Ahe…….

close